गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदननगर येथील भारतीय सैन्य दलात माजी सैनिक असणाऱ्या मुस्लिम कुटुंबीयांवर 70 ते 80 समाजकंटकांनी दहशत पसरवण्याची घटना घडली आहे. रात्री बारा वाजता घरात घुसून महिला व लहान मुलांवर दहशत पसरवण्याचा या कुटुंबाचा आरोप आहे. यासंदर्भामध्ये पोलीस स्टेशनला माहिती देवुन सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल न करता समाजकंटकांच्या दबावाखाली कोणतीच कारवाई केली नाही असा आरोपही कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलीस उपयुक्त सोमय्या मुंडे यांच्याकडे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
शमशाद अली शेख कुटुंबीयांचे आजोबा व चुलते भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा बजावत निवृत्त झालेले आहेत. त्यांना भारतीय सैन्यामध्ये चांगली सेवा केल्याबद्दल अनेक पदके देखील मिळाली आहेत. हे कुटुंबीय 55 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून चंदननगर भागामध्ये राहतात. समाजकंटकांच्या टोळक्याने 26 जुलै रोजी रात्री बारा वाजता त्यांच्या घरात घुसून गोंधळ घातला. शिवाय आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून तुम्ही इथून निघून जा अशा प्रकारचा दबाव निर्माण केला होता. तुम्ही रोहिंग्या आहात असं ही काही जण म्हणाले.
या संपुर्ण घटनेवेळी त्यांच्या समवेत पोलीस देखील उपस्थित होते. ते हा संपूर्ण प्रकार केवळ मूकपणे पाहत होते असा आरोपही या कुटुंबाने केला आहे. रात्री साडेतीन वाजेपर्यंत समाजकंटकांच्या दबावामुळे सैन्य दलातील कुटुंबीयांना पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आले होते. यामध्ये वयोवृद्ध महिला , जेष्ठ नागरिक यांच्यासह तेरा व बारा वर्षाच्या लहान मुलांचा देखील समावेश आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या घटना शहरांमध्ये वाढत असल्याने या घटनांना वेळीच आवर घालावा अशी विनंती करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात येणार असून आजच पोलीस उपायुक्त सोमय्या मुंडे यांच्याशी फोन द्वारे चर्चा झाली असून त्यांना लेखी निवेदनाद्वारे पत्र देखील पाठवण्यात आले “ असल्याचे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यावेळी कळविले आहे. दरम्यान सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी येरवडा येथिल पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.