सूरज कसबे
एक असा अपघात ज्याने सर्वच जण आवाक झाले आहेत. या अपघातात सख्ख्या भावा बहिणींना आपला जीव गमवावा लागला आहे. या चिमुकल्यांचा काही दोष नसताना त्यांनी आपला जीव गमावला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला आहे. ही घटना पुण्याचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी इथं घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकाचे वय आठ वर्षे तर दुसऱ्याचे वय सहा वर्ष आहे.
पुण्यातील आयटी हब हिंजवडी येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव बस येत होती. ड्रायव्हरचे बसवरचे नियंत्रण सुटले. बसला नियंत्रीत करण्याच्या नादात हीबस थेट फुटपाथवर चढली. त्यावेळी बरीच लोक या फुटपाथवरून चालली होती. त्यांनी आपला जीव कसाबसा वाचवला. पण त्यात दोन चिमुकले काही समजण्याच्या आत या बसखाली चिरडले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यात दोन लहानग्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांची नावे अर्चना देवा प्रसाद वय 8 वर्षे आणि सूरज देवा प्रसाद वय 6 वर्षे अशी आहेत. तर या अपघातात प्रिया देवा प्रसाद ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अविनाश चव्हाण या पादचारी व्यक्तीसह बसमधील काही प्रवासीही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अन्य काही लोक ही या अपघातात जखमी झाल्याचे समोर आले आहे. या अपघातानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड रस्त्यावर हा अपघात घडला. आयटी कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारी ही बस होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांवर नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे अपघात कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहचले होते. त्यांनी पंचनामा केला. शिवाय तिथे जमलेली गर्दी ही बाजूला केली. बसचालक हा मद्यधुंद होता. त्यामुळे हा अपघात झाला. त्याला हिंजवडी पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.