- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि बल्लारपूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात अभिनेत्री रिंकू राजगुरू उतरली होती.
- भाजपने रिंकू राजगुरूला प्रचारासाठी मैदानात उतरवले होते.
- रिंकू राजगुरूने प्रचारात भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.
अभिषेक भटपल्लीवार
नगरपालिका आणि नगरपंचातीसाठी प्रचाराचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया केल्या गेल्या. त्यात काही मराठी अभिनेत्रींनाही निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरवण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि बल्लारपूर नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारात थेट सैराट फैम रिंकू राजगुरू उतरली होती. तिने जाहीर सभेला उपस्थितीत लावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन ही केले. तिला पाहण्यासाठी या दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
रिंकू राजगुरू सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचली. तिचा एक मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे. तिच्या लोकप्रियतेचा फायदा राजकीय पक्ष घेताना दिसत आहे. त्यामुळेच मूल आणि बल्लारपूर शहरात प्रचारासाठी ती आली होती. ही शहर भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांचा गड मानली जातात. हे पाहाता रिकू राजगुरूला प्रचारासाठी भाजपने एक दिवस मैदानात उतरवले होते. सैराटच्या या आर्चीला पाहण्यासाठी दोन्ही शहरात मोठी गर्दी झाली होती. तिची एक झलक पाहाता यावी म्हणून सर्वच जण धडपडत होते.
यावेळी रिंकूने एक छोटेखानी भाषण ही ठोकले. ती म्हणाली की उशिर झाला आहे. तरी इथं लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच जण उपस्थित आहे. आजी,ताई,काकी सर्वच इथं आल्या आहेत. हे केवळ सुधीर भाऊंवरील प्रेमापोटी सर्व जण जमा झाले आहेत. या भागातील लोकांनी नेहमीच सुधीर भाऊंवर प्रेम केले आहे. हे प्रेम या पुढे ही असेच राहु द्या असं आवाहन तिने यावेळी उपस्थितांना केले. काही मिनिटं तिने या मतदारांसोबत संवाद साधला. शिवाय सुधीर भाऊंच्या कामाच कौतूक ही तिने केलं.
रिंकू राजगुरू यावेळी म्हणाली की मी इकडे येत असताना अनेक लोकांनी सुधीर भाऊंच्या कामाबद्दल सांगितलं. त्यांनी खूप चांगलं काम या भागात केलं आहे. ते यापुढे ही तसचं सुरू राहील असं ही तिने सांगितले. मूल आणि बल्लारपूर नगरपरिषदेसाठी उद्या म्हणजेच मंगळवारी दोन डिसेंबरला मतदान होत आहे. रिंकू राजगुरू प्रचारात उतरल्याने इथल्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सैराट चित्रपटाच्या गाण्याचा संदर्भ देत भाजपला मतदान करा अन्यथा 5 वर्षे 'याड लागल्या शिवाय राहाणार नाही असं म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world