पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून होणाऱ्या वाहन खरेदी-विक्री संदर्भातील संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक राहील. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी माहिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशामुळे जो कोणी व्यावसायिक जुन्या वाहनांची खरेदी विक्री करत असेल त्याला ही माहिती पोलीसांना द्यावीच लागणार आहे.
ग्रामीण भागामध्ये वाढत्या नागरी वसाहतींमुळे जुन्या मोटारसायकली व इतर वाहनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत योग्य तपशील न ठेवल्यामुळे चोरीच्या वाहनांची खरेदी-विक्री होण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या उघडकीस येण्यास अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. या काळात अशा वाहनांची माहिती व्यावसायिकांना द्यावी लागणार आहे. पुणे परिसरात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत.
व्यावसायिकांनी खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांचा क्रमांक, इंजिन व चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव व संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आरसी, टीसी पुस्तक, तसेच खरेदीदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र यासह तपशीलवार माहिती संकलित करून दर 7 दिवसांनी संबंधित पोलीस ठाण्याला सादर करणे आवश्यक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसे न करणाऱ्या विरुद्ध थेट कारवाईचे आदेशच काढण्यात आले आहेत.