Junnar Gold Mango: 'गोड न्यूज'! 'जुन्नर गोल्ड' आंब्याला केंद्र शासनाची अधिकृत मान्यता; काय आहेत वैशिष्ट्ये?

Pune News: जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी गावचे शेतकरी भरत जाधव यांनी अनेक वर्षांच्या अथक प्रयोगातून 'जुन्नर गोल्ड' हा आंब्याचा खास वाण विकसित केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे

Pune mango News: पुणे जिल्ह्याच्या कृषी समृद्ध जुन्नर तालुक्याच्या मातीतून एक मोठी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. येथील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेला 'जुन्नर गोल्ड' हा आंबा वाण आता केवळ स्थानिक बाजारापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर त्याला केंद्र शासनाकडून जीआय टॅग/शेतकरी वाण म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे.

जुन्नर गोल्डची वैशिष्ट्ये

जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी गावचे शेतकरी भरत जाधव यांनी अनेक वर्षांच्या अथक प्रयोगातून 'जुन्नर गोल्ड' हा आंब्याचा खास वाण विकसित केला. दिल्ली येथील प्रोटेक्शन ऑफ प्लान्ट व्हरायटिझ अँड फार्मर्स राईट ऑथरिटी (PPV&FRA) या संस्थेकडून या वाणाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

या आंब्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात हापूसचा अप्रतिम स्वाद, केशरचा आकर्षक रंग आणि राजापुरीचा मोठा आकार अशा तिन्ही उत्तम गुणांचा अनोखा संगम आहे. या आंब्याचे फळ जवळपास 900 ग्रॅम ते 1 किलो वजनाचे असते. आकर्षक रंग आणि चवीमुळे बाजारात याला मोठी मागणी आहे.

कृषी क्षेत्राला नवी ओळख

या यशाबद्दल भरत जाधव यांचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे. या 'जुन्नर गोल्ड' वाणामुळे जुन्नर तालुक्याच्या कृषी परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे हा वाण विकसित करण्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

Advertisement

नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न तात्या मेहेर यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, "भरत जाधव यांनी अनेक वर्ष केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे जुन्नरला एक अद्वितीय ओळख मिळाली आहे. कृषी विज्ञान केंद्राने त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन पुरवले."

शेतकरी भरत जाधव यांनी देखील यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. "मी लहानपणापासून आंब्यावर प्रयोग करत होतो. आज माझ्या आंब्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली, याचा खूप आनंद आहे. यामुळे जुन्नरच्या शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे."

Advertisement

Topics mentioned in this article