नाना पाटेकर हे जसे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात तसे ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ही परिचित आहेत. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्याचं काम केलं आहे. शिवाय स्वत:च्या पायावर उभं कसं राहायचं याची हिंमत या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता नाना पाटेकर यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे त्यांच्या निवृत्तीची. त्यांनी सामाजिक कार्यासाठी सिनेमा आणि नाटकातून निवृत्ती घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. NDTV मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही भावना बोलून दाखवली आहे.
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकरी वर्गात गेल्या 10 वर्षात मोठं काम झालं आहे. आपल्याला काय जमतं ते करायचं. गप्प पणे जे जमतं ते करायचं. दहा वर्षात काय केलं? आपण हाती घेतलेलं काम पुढे गेलं का? हे अधिक महत्वाचं आहे. शेतकऱ्यांनासाठी काम करणारी नवी पिढी नाम फाऊंडेशन मार्फत तयार करणे गरजेचं आहे. त्यासाठी वेळ लागेल. बांधणी करावी लागेल असं ही नाना पाटेकर यावेळी म्हणाले. या कामात जे बरोबर येतील त्यांना घेवून पुढे जाणार नाही आले तर आम्ही पुढे जाणार. चांगल्या कामात कुणी अडवं येत नाही. चांगल्या कामात मदत होते. नामचं काम सर्वांनीच पाहिलं आहे. ते आता आणखी पुढे न्यायचं आहे.
त्यामुळे आता सिनेमा आणि नाटकातून निवृत्त होणार. सिनेमा नाटका ऐवजी शेतकरी हा आपली प्राथमिकता राहील असं नाना यांनी स्पष्ट केलं आहे. हे सर्व काही बाजूला ठेवणार आहे. शेतकऱ्यांसाठी गावागावात फिरणार आहे. लोकाना भेटणार आहे. जास्तीत जास्त वेळ लोकांसाठी देणार आहे. त्यामुळे या पुढच्या काळात सिनेमा आणि नाटकातून निवृत्त होत आहे याचीच घोषणा नाना पाटेकर यांनी या निमित्ताने केली आहे. ज्यावेळी नाटक करत होतो तेव्हाही आम्ही गावागाव फिरत होता. आता ही निवृत्ती नाही तर हीच खरी सुरूवात असल्याचं ही ते म्हणाले.
सरकार शेतकऱ्यासाठी काय करतं याची वाट पाहात बसायचं नाही. आपली ही काही जबाबदारी आहे. सरकारच्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आहेत. पण त्यातल्या किती योजना शेतकऱ्यांना माहित आहेत किंवा त्या त्यांच्या पर्यंत पोहोचल्या आहेत असा प्रश्न नाना यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. लाडकी बहीण सारखी योजना कशा पद्धतीने प्रसिद्ध होते. तिला प्रसिद्धी मिळते पण शेतकऱ्यांच्या किती योजनांना प्रसिद्धी मिळते अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळेच या पुढचा काळ गावागावात घालवणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. सर्व काही छान होईल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. तर आम्हाला कुठल्याही वाद विवादात पडायचं नाही. आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र आणायचं आहे असं यावेळी मकरंद अनासपूरे यांनी सांगितलं.