Pune News: नवले ब्रिजवरून गाडी चालवण्यासाठी आता नवा नियम, तर पालखी सोहळ्यानिमित्त आरटीओ आळंदी रस्ता...

सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय पुणे वाहतूक विभागाने घेतला आहे.  पुणे शहर वाहतूक विभागाने भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या हद्दीतील अभिनय स्कूल ते नवले ब्रिज या दरम्यान नवा नियम लागू केला आहे. या ठिकाणी सर्वसामान्य वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा 40 किमी प्रतितास निश्चित केली आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने हा आदेश जारी करण्यात आला आहे. सध्या पुण्यात पावसाचा जोर ही आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पोलीस उपआयुक्त वाहतूक डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार हा आदेश लागू केला आहे.  अत्यावश्यक सेवांतील वाहने त्यात अग्निशमन, पोलीस, रुग्णवाहिका यांना या वेगमर्यादेतून सूट देण्यात आली आहे. यापूर्वी या मार्गावरील वेगमर्यादेबाबतचे सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी स्पीडोमीटर नियमित तपासून मार्गावरील सूचना फलक व वाहतूक चिन्हांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही व स्पीड गन प्रणालीद्वारे नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, काय आहे कारण?

तर दुसरीकडे पालखी सोहळ्यानिमित्त 9 जुलै रोजी आरटीओ आळंदी रस्ता व आयडीटीआरचे कामकाजात बदल करण्यात आला आहे. संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त 9 जुलै 2026 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रस्ता कार्यालयातील वाहन तपासणी व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीचे नियमित कामकाज होणार नाही. तसेच आयडीटीआरकडे जाणारे मार्ग बंद राहण्याची शक्यता असल्याने तेथील चाचण्यांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे हे बदल करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

नक्की वाचा - Viral News: 290 कोटींचा बंगला, अवघ्या 830 रूपयांना विकत घेतला! सर्वांनाच चकीत करणारा व्यवहार कसा झाला?

9 जुलै रोजी वाहन तपासणी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी अपॉइंटमेंट असलेल्या सर्व अर्जदारांना 10 ते 20 जुलै 2026 या कालावधीत कोणत्याही कार्यालयीन दिवशी उपस्थित राहून चाचणी देता येणार आहे. तसे आरटीओ मार्फत कळवण्यात आले आहे. 9 जुलैची अपॉइंटमेंट वैध मानली जाणार असल्याचे ही  प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.