- पुण्यातील वारजे परिसरात मद्यधुंद अवस्थेत असलेला कार चालक अनेक वाहनांना धडक देत धुमाकूळ घातला होता
- पोलीस कर्मचाऱ्याने चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालक गाडी घेऊन पळून गेला
- पोलिसांनी तातडीने पाठलाग करून गाडी अडवली आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे
पुण्यातील वारजे परिसरात एका मद्यधुंद कार चालकाने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या धुंदीत असलेल्या या चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. पण त्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा मद्यधुंद चालकाने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी या मग्रूर चालकाचा माज भररस्त्यात उतरवला आहे.
आरोपी चालक उत्तम अहिल्यानगरहून वारजेच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने वाटेत येणाऱ्या अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. गाडी थांबवण्यासाठी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कारमध्ये प्रवेश केला.
मात्र, आरोपीने गाडी न थांबवता तशीच पुढे दामटली आणि पोलिसालाच घेऊन पळू लागला. इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने पाठलाग करून कार अडवली. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत पोलिसांनी आरोपीला भररस्त्यात 'प्रसाद' दिला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम नगर ते वारजे या मार्गावर हा थरार घडला. आरोपीने आपल्या कारने एकापाठोपाठ एक अशा अनेक वाहनांना ठोकले. अपघातानंतर जमाव गोळा झाला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलीस निरीक्षक आपल्या टीमसह तिथे पोहोचले. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रोखण्यासाठी कारचे दार उघडून आत बसण्याचा प्रयत्न केला, पण चालकाने गाडी सुसाट पळवली. काही अंतर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी गाडीला घेराव घातला आणि चालकाला बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात पोलीस आरोपीला चोप देताना दिसत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.