देवा राखुंडे
पुण्याच्या इंदापुरातील भिगवण मध्ये शासनाच्या जागेवर शासकीय निधीतून बांधलेले शौचालय एका रात्रीत गायब झालं. हे शौचालय रात्रीत पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 25 ऑक्टोंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास भिगवण गावच्या हद्दीमध्ये भैरवनाथ शाळेच्या पाठीमागे हे शौचालय होतं. शासकीय जागेत शासकीय निधीतून ते सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं होतं. हेच शौचालय जेसीबी मशीनद्वारे पाडण्यात आलं. याची कानोकान खबर कुणालाच झाली नाही. सकाळी उठल्यावर ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. अशा प्रकारे शासकीय मालमत्तेचे दीड लाख रुपयांचे नुकसान अज्ञातांनी केले आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यानी तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण...
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील भैरवनाथ हायस्कूलच्या पाठीमागे सर्वे नंबर 805 मध्ये सन 1990-91 मध्ये हे शौचालय भिगवण ग्रामपंचायतीने शासकीय निधीतून बांधलं होतं. मागील दोन वर्षांपूर्वी याची भिगवण ग्रामपंचायतच्या मार्फत दुरुस्ती ही करण्यात आली होती. त्या ठिकाणच्या असणाऱ्या काही कुटुंबांना याचा लाभ देखील होत होता. मात्र 25 ऑक्टोबरच्या रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक एका जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आले. भिगवण मधीलच मौला इब्राहिम मुलाणी आणि इतरांनी मिळून हे शौचालय जमीन उद्ध्वस्त केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तशी तक्रार देण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी ही तक्रार दिली आहे.
शौचालयाच्या जागेचा वाद
भिगवण ग्रामपंचायतचे सरपंच गुरप्पा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,या शौचालयाच्या जागेवरून वाद आहे. ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा मुलाणी कुटुंबाचा आहे. तर दुसऱ्या संबंधित जागेच्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासन अशी नोंद आहे.इतर हक्कात मुलाणी कुटुंबाची नावे आहेत.यावर अनिकेत भिसे यांनी वर्षभरापूर्वी भिगवण ग्रामपंचायत समोर उपोषण केलं होतं. भिसे यांच्या म्हणण्यानुसार ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे. त्याची देखभाल भिगवण ग्रामपंचायतने करावी अशी त्यांची मागणी होती.
प्रकरण आहे न्यायप्रविष्ठ
याप्रकरणी भिगवण ग्रामपंचायत ने इंदापूर तहसीलदारांकडे दावा दाखल केला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र असा असतानाच काल 25 ऑक्टोबर च्या रात्री साडेअकरा वाजता अचानकपणे या ठिकाणचे हे शौचालय उध्वस्त करण्यात आल्यानं स्थानिक रहिवाशांची गैरसोय झाली आहे. शिवाय याप्रकरणी भिगवण पोलिसात आता ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.