यशपाल सोनकांबळे, पुणे
पुणे शहर आणि जिल्हा परिसरात सुरू असलेल्या पावसाचा जोर प्रचंड वाढला असून हवामान खात्याने आज, 6 जुलै रोजी जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दुसरीकडे, सततचा पाऊस आणि घाटात दरड कोसळल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबई-पुणे महामार्ग पुढीस आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहेत.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि जुना महामार्ग दोन्ही बाजूने बंद
सतत सुरू असलेला पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे अशा दोन्ही दिशेकडची वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सध्यातरी या दोन्ही मार्गांवरून प्रवास न करण्याचे आणि अत्यंत आवश्यक असल्यास प्रशासनाकडून अद्ययावत माहिती घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
लोणावळा-कर्जत घाटात दरड कोसळली; 16 एक्स्प्रेस गाड्या रद्द
लोणावळा-कर्जत दक्षिण-पूर्व घाट सेक्शनमध्ये रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे मध्य रेल्वेने 6 जुलै रोजी धावणाऱ्या 16 प्रमुख एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.
रद्द करण्यात आलेल्या प्रमुख गाड्या
- इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्या रद्द
- सीएसएमटी–धुळे एक्स्प्रेस आणि धुळे–सीएसएमटी एक्स्प्रेसही रद्द
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले
- अहमदाबाद–कोल्हापूर, अहमदाबाद–पुणे दुरांतो, इंदूर–दौंड, बिदर–सीएसएमटी, नांदेड–पनवेल, चेन्नई–सीएसएमटीसह अन्य गाड्यांचा समावेश
- मार्ग बदललेल्या गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड तसेच पर्यायी मार्गांवरून धावणार
पुण्यात शाळांना सुट्टी
मुसळधार पावसाची स्थिती पाहता पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रविवारी रात्री उशिरा शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. सोमवार, 6 जुलै रोजी पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमधील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा (सर्व माध्यमे) पूर्णपणे बंद राहतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी असली, तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कोणत्याही कामासाठी शाळा प्रशासनाने सज्ज राहावे, असे आदेशात म्हटले आहे.
प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
पुणे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सद्यस्थितीत नदी-नाले, धबधबे किंवा वेगवान पाण्याचा प्रवाह असलेल्या पर्यटन स्थळांवर जाणे पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यक प्रवास टाळून हवामान विभाग आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे म्हटले आहे.