Pune's Iconic Garden Vada Pav: पुणे शहरात नोकरीच्या शोधात आलेला एक सामान्य तरुण आज चक्क बॉलीवूड सेलिब्रिटी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांच्या पसंतीचा मानकरी ठरला आहे. ही गोष्ट आहे अहमदनगर जवळील भिंगार या छोट्याशा गावातून पुण्यात आलेल्या काशीनाथ नायकू यांची, ज्यांनी 5 दशकांपूर्वी सुरू केलेला एक छोटासा गाडा आज पुण्यातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे. मुंबईची ओळख असलेला वडापाव पुण्यातही तितक्याच ताकदीने पाय रोवून उभा आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कँप परिसरातील 'गार्डन वडापाव'. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मापासून ते जपानच्या राजदूतांपर्यंत सर्वांनाच या वडापावने भुरळ घातली आहे.
एका जिद्दीची आणि संघर्षाची सुरुवात
1972 मध्ये काशीनाथ नायकु आपल्या पत्नीसह जेव्हा पुण्यात आले, तेव्हा त्यांच्याकडे हाताला कोणतेही काम नव्हते. पुण्यात फिरत असताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, कामावर जाणारे मजूर आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना मधल्या सुट्टीत पोटभर आणि स्वस्त जेवण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
याच विचारातून त्यांनी एका छोट्या हातगाडीवर वडापाव विकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी केवळ 6 पैसे दराने साधी भजी आणि पावाची विक्री सुरू केली. पुढे त्यांनी वडापावसोबत मसाला ताक देण्यास सुरुवात केली आणि बघता बघता गरम वडापाव आणि थंडगार मसाला ताक हे समीकरण पुणेकरांच्या पसंतीस उतरले.
( नक्की वाचा : Amravati News: महिन्याला मिळायचे फक्त 150 रुपये, आज 15 कोटींची उलाढाल! अमरावतीच्या शेतकऱ्याला 'ऑक्सफर्ड'मधून बोलावणं )
सेलिब्रिटींच्या पसंतीची खास चव
गार्डन वडापावची चव केवळ सर्वसामान्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि वडापाव प्रेमी म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा जेव्हा पुण्यात मुक्कामी होता, तेव्हा त्याने मुद्दाम इथल्या वडापावची चव चाखली होती. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेल्या रोहितसाठी खास या ठिकाणाहून वडापाव मागवण्यात आले होते.
केवळ रोहितच नाही, तर सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, शबाना आझमी, आयुष्मान खुराना आणि प्रसिद्ध गायक बी प्राक यांनीही या चवीचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांनीही या गाड्याला भेट देऊन इथल्या वडापाववर ताव मारला आहे.
घरगुती चटणी आणि वैशिष्ट्यपूर्ण आकार
पुण्यातील इतर वडापावच्या तुलनेत गार्डन वडापावची ओळख त्याच्या वेगळ्या आकारामुळे आणि घरगुती चवीमुळे आहे. येथील वडा हा गोल नसून तो थोडा चपटा आणि लांबट आकाराचा असतो, ज्यामुळे तो पावामध्ये व्यवस्थित बसतो. या वडापावचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यासोबत दिली जाणारी हिरवी चटणी.
ही चटणी पूर्णपणे घरगुती पद्धतीने आणि एका गुप्त रेसिपीने तयार केली जाते, असे या व्यवसायाची तिसरी पिढी सांभाळणारे चेतन नायकु सांगतात. आजही या चटणीची आणि वड्याची चव तीच राखली गेली आहे, जी काशीनाथ यांनी 50 वर्षांपूर्वी सुरू केली होती.
तिसऱ्या पिढीचा यशस्वी वारसा
काशीनाथ नायकु यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाची धुरा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजे राजेंद्र, संजय, नंदू आणि दीपक यांनी सांभाळली. आज त्यांची तिसरी पिढी म्हणजेच धीरज, चेतन, अक्षय आणि दीप हे पूर्ण निष्ठेने हा वारसा पुढे चालवत आहेत. एकेकाळी 6 पैशांना मिळणारा हा वडापाव आज 25 रुपये किमतीला मिळतो.
कँपमधील जेजे गार्डनच्या समोर असलेल्या या गाड्यावर आज दररोज सुमारे 5000 वडापावची विक्री होते. एका सामान्य मजुराच्या गरजेतून सुरू झालेला हा प्रवास आज पुणे शहराची शान बनला असून, हा वडापाव खाण्यासाठी आजही खवय्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात.