Pune News: पुण्यात रातोरात काय घडलं? सारसबाग दिवाळी पहाट कार्यक्रम होणार, आयोजकांचा यू टर्न!

Pune Sarasbaug Diwali Pahat: पुण्यातील सारसबाग येथे गेली 28 वर्षे अखंडपणे सुरू असलेला दिवाळी पहाट कार्यक्रम अखेर होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News : काही हिंदुत्ववादी संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता.
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Sarasbaug Diwali Pahat: पुण्यातील सारसबाग येथे गेली 28 वर्षे अखंडपणे सुरू असलेला दिवाळी पहाट कार्यक्रम अखेर होणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे आणि समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या धमकीवजा इशाऱ्यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, पुणे पोलिसांनी यात मध्यस्थी केल्यानंतर आयोजकांनी माघार घेत हा लोकप्रिय कार्यक्रम दिवाळी पाडव्याच्या दिवशी आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे. कार्यक्रमात कोणताही खंड पडू नये यासाठी पोलिसांनी आयोजकांना सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे, हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र या कार्यक्रमाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत 'जिहादी व्यक्ती' कार्यक्रमात घुसल्यास विरोध कायम राहील, असा इशारा दिला आहे.

कसा बदलला निर्णय?

पुण्यातील सारसबाग येथे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित होणारा दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा होणार की नाही, याबद्दल निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. गेली 28 वर्षे हा कार्यक्रम नित्यनेमाने पार पडत आहे, मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांनी याला विरोध केल्यामुळे आयोजकांनी बुधवारी (22 ऑक्टोबर) रोजी होणारा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली होती.

आयोजक युवराज शहा, जितेंद्र भूरूक आणि सह-संयोजकांनी 'अपरिहार्य कारणांमुळे' आणि समाजमाध्यमांवरील आक्षेपांमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुणे पोलिसांनी यात तातडीने हस्तक्षेप केला आणि हा दिवाळी पहाट कार्यक्रम नित्यनेमाने घेण्याच्या सूचना आयोजकांना दिल्या. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आयोजकांनी आपला निर्णय बदलला असून, उद्या म्हणजे दिवाळी पाडव्याला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, कार्यक्रमाची तयारी पुन्हा सुरू झाली आहे.

( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )
 


विरोध नेमका कशासाठी?

या वादाचे मूळ समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आहे. या व्हिडिओमध्ये कार्यक्रमावर आक्षेप घेण्यात आला होता. एवढेच नाही, तर 'जर तेथे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर उलट पोलिसांना जबाबदार धरले जाईल', असा जाहीर इशाराही देण्यात आला होता, असे आयोजकांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.

Advertisement

हा इशारा पाहता, 'ऐन दिवाळीच्या काळात पोलीस आपले घर सोडून अहोरात्र मेहनत करत असताना त्यांनाच वेठीस धरणे आम्हाला मान्य नाही', अशी भूमिका घेऊन आयोजकांनी कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असतानाही तो रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 'आजवरच्या आनंदी सांगीतिक परंपरेला नाहक गालबोट लागू नये' आणि 'काही घडल्यास त्याचे खापर विनाकारण संयोजकांवर फोडले जाऊ नये', या स्पष्ट कारणांमुळे त्यांनी माघार घेतली होती.

हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा कायम

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कार्यक्रम पुन्हा सुरू होत असला तरी हिंदुत्ववादी संघटनांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. आमचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला कोणताही विरोध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, 'त्या कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहादी व्यक्तीच्या लोकांना विरोध आहे,' असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

यासाठी त्यांनी हिंदूंना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच, 'उद्या आम्ही कार्यक्रमात सहभागी होणार आणि जर काही चुकीचे झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार,' असा इशाराही हिंदू संघटनांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला कार्यक्रमाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. काही उपद्रवी प्रवृत्तींमूळे हजारो रसिकांना या पर्वणीपासून दूर राहावे लागू नये, यासाठी आयोजकांनी खंत व्यक्त केली होती. आता पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुणेकरांना ही सांस्कृतिक पर्वणी पुन्हा अनुभवता येणार आहे.