Pune News : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलं आहे. शहरातील सिंहगड रस्त्यावर लवकरच मेट्रोचं काम सुरू होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच 118 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या उड्डाणपुलाचं आता काय होणार? याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
काय आहे कारण?
या विषयावर महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचे खांब (Pillars) उभारण्यासाठी उड्डाणपुलाचा काही भाग फोडावा लागणार आहे. एकूण 66 ठिकाणी पुलाला 'छेद' देऊन हे खांब वर नेले जातील. परिणामी, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंची रुंदी प्रत्येकी साधारण 1 मीटरने कमी होणार आहे. सध्या पुलाच्या एका बाजूची रुंदी 7.32 मीटर आहे, जी मेट्रोचे खांब बसवल्यानंतर 6.32 मीटर इतकी राहील. याचा अर्थ वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग थोडा अरुंद होणार आहे. यामुळे नागरिकांना काही दिवसांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी
केंद्र सरकारने नुकतीच खडकवासला-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-माणिकबाग या 32 किलोमीटरच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने 118 कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल सुरू केला होता. या पुलामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. मात्र, आता या नवीन मेट्रो मार्गाच्या कामामुळे या उड्डाणपुलावर बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
महापालिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुलाचे बांधकाम करतानाच भविष्यातील मेट्रोचा विचार करून त्यासाठीची जागा राखून ठेवण्यात आली होती. महामेट्रोने मेट्रो मार्गाचा डीपीआर (Detailed Project Report) तयार करताना महापालिकेसोबत समन्वय साधला होता. या मार्गावर एकूण 105 खांबांची अलाइनमेंट निश्चित करण्यात आली आहे.
त्यापैकी 39 खांबांचा पाया (Foundation) उड्डाणपुलाखाली आधीच घेऊन ठेवला आहे. उर्वरित खांब उभारताना पुलाचा भाग कापून त्यातून खांब वर नेले जातील. हे संपूर्ण काम झाल्यानंतर दोन्ही बाजूंना दोन-दोन वाहतूक मार्गिका उपलब्ध राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Mumbai Local News : मुंबई लोकलच्या 'या' स्टेशनचे नाव अचानक बदलले! काय आहे कारण? )
पुणेकरांची मागणी
राजाराम पूल ते वडगाव या रस्त्यावर साधारण 30 मीटर अंतरावर एक-एक खांब उभारला जाईल. उड्डाणपुलाच्यावर सुमारे 5.5 मीटर उंचीवरून ही मेट्रो धावणार आहे. पुण्यात यापूर्वी उड्डाणपुलांच्या बांधकामात झालेल्या चुका लक्षात घेता, हे काम सुरू करण्याआधी प्रशासनाने बदलांबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. सिंहगड रस्त्यावरही कोणताही गैरसमज किंवा अतिरिक्त खर्च टाळावा, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे.