Pune Success Story: धुणी-भांडी करणाऱ्या आईचा लेक झाला न्यायाधीश, संघर्षातून उभा राहिलेला यशाचा दीप

पहिल्याच प्रयत्नात त्यांनी न्यायाधीश परीक्षेत यश मिळवले असून, संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार 

Pune News: जिद्द आणि कष्टाच्या जोरावर माणूस काय साध्य करू शकतो, याचं जिवंत उदाहरण पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये पाहायला मिळालं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर येत मंगेश आनंद धोत्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळव आहे. त्यांनी 'दिवाणी न्यायाधीश' (कनिष्ठ स्तर) पदी आपली मोहोर उमटवली आहे. त्यांच्या या मेहनतीला साथ मिळाली ती त्यांच्या आईची. त्यांनी धुणी भांडी करून आपल्या लेकाला शिकवलं. त्याची जाण लेकानं ही ठेवली. शेवटी त्यांनी यश संपादीत करत आईचं स्वप्न पूर्ण केलं. ते आता दिवाणी न्यायाधीश म्हणून काम करतील. 

मंगेश यांचे कुटुंब मूळचे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील आहे. मात्र, उदरनिर्वाहासाठी 2005 साली त्यांचे कुटुंब राजगुरुनगरमध्ये स्थायिक झाले. मंगेश यांच्या आईने दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करून आणि वडिलांनी खाजगी रुग्णालयात काम करून त्यांना शिकवले. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही पालकांनी मुलाच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. आज मुलाच्या या यशाने पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. लेकाच्या यशाने आई- वडीलांना आकाश ठेंगणे झाले आहे. त्यांचा लेक आता साहेब झाला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - RTO News: आता रिक्षावाल्यांना मराठी बोलावेच लागणार! नाही तर..., परिवहन विभागाच्या निर्णयाने धाबे दणाणले

आजच्या काळात स्पर्धा परीक्षेसाठी महागडे क्लास लावण्याची पद्धत असताना, मंगेश यांनी गावातच राहून स्वअभ्यासावर भर दिला. कोणताही मोठा क्लास न लावता त्यांनी हे यश संपादन केले आहे. वकिली व्यवसायात असताना मिळालेले ज्ञान आणि मार्गदर्शक प्रा. किरण काळे व ऍड. पुष्कराज परदेशी यांच्या मार्गदर्शनामुळे मुलाखतीत त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील या तरुणाने कौटुंबिक गरिबीवर मात करत न्यायाधीशाची झूल अंगावर चढवली आहे. 

नक्की वाचा - Pune News: 3 मित्र, 20 देश, 75 दिवस अन् 16 हजार किमीचा प्रवास, पुणे ते लंडन बाय रोड! एक गोष्ट थक्क करणारी

मंगेश धोत्रे यांची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षेत उतरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारी आहे. आईच्या कष्टाची जाणीव ठेवून मंगेश यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश खेचून आणले. स्वयंशिक्षणावर दिलेला भर आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा पल्ला गाठला आहे. ज्या हातांनी मुलाच्या भविष्यासाठी इतरांची धुणी-भांडी केली, त्याच हातांनी आज आपल्या न्यायाधीश मुलाला पेढा भरवला. राजगुरुनगरच्या मंगेश धोत्रे यांनी नियतीला हरवून यशाचे शिखर गाठले आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही मंगेशने कधी हार मानली नाही. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी न्यायाधीश परीक्षेत यश मिळवले असून, संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.