Pune News: पुणेकरांचा कणा समजल्या जाणाऱ्या गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ज्या दुमजली उड्डाणपुलाकडे सर्वांचे डोळे लागले होते, तो अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 8 मार्च रोजी रविवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या पुलाचे दिमाखात लोकार्पण करण्यात आले. मात्र, गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपल्यानंतर पुणेकरांच्या पदरात सुखाचा प्रवास पडण्याऐवजी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला हा 'डबल डेकर' पूल पहिल्याच दिवसापासून वाहनचालकांसाठी एक नवे कोडे ठरत असून, विद्यापीठ चौकातील चक्रव्यूह भेदताना पुणेकरांची चांगलीच दमछाक होत आहे.
का होतोय त्रास?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा विळखा सैल करण्यासाठी या भव्य पुलाची उभारणी करण्यात आली. पाषाण, बाणेर, औंध आणि शिवाजीनगर या महत्त्वाच्या उपनगरांना जोडणारा हा मुख्य दुवा असल्याने पुणेकरांना मोठ्या दिलासा मिळण्याची अपेक्षा होती.
आनंद ऋषी चौकातून जाणाऱ्या या पुलाच्या एका भागावरून प्रवास करताना वाहनचालकांना नेमके कुठे उतरायचे आणि कोणत्या लेनमधून जायचे, याचा थांगपत्ता लागत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे पुलावर आणि पुलाच्या सुरुवातीला आवश्यक असलेले स्पष्ट दिशादर्शक फलक अजूनही लावण्यात आलेले नाहीत. पुरेशी माहिती नसल्याने ऐन वेळी लेन बदलण्याच्या नादात वाहनांच्या रांगा लागत आहेत आणि ज्या कोंडीतून सुटका हवी होती, तीच कोंडी पुलावर पाहायला मिळत आहे.
रस्त्यावरील अडथळे आणि अरुंद मार्गांचा फटका
उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन तो सुरू झाला असला, तरी खालच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची स्थिती अजूनही बिकट आहे. पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतूक वळवण्यासाठी गणेशखिंड रस्ता ते पाषाण या मार्गावर मोठे काँक्रीटचे डिव्हायडर बसवण्यात आले होते.
पूल सुरू झाल्यानंतर हे अडथळे हटवणे अपेक्षित होते, मात्र अनेक ठिकाणी हे जड डिव्हायडर रस्त्यावरच पडून आहेत. यामुळे वाहनचालकांना रस्ता अरुंद मिळत असून, विशेषतः संध्याकाळच्या वेळी संचलन करताना मोठी अडचण येत आहे.
प्रशासकीय नियोजनाच्या या त्रुटीमुळे नव्या पुलाचा आनंद घेण्याऐवजी वाहनचालकांना पुन्हा एकदा संथ वाहतुकीचा सामना करावा लागत आहे.