- पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने 56 भूमिगत बोगद्या बांधण्याची योजना आखली आहे
- येरवडा ते कात्रज दरम्यान प्रमुख बोगद्यासह 54 किलोमीटर लांब भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे
- पुण्यातील 32 मुख्य रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अडीच पट अधिक वाहतूक असते. ती कमी होण्यास मदत होईल.
Pune Katraj Tunnel: पुणे शहराची ओळख आता 'विद्येचे माहेरघर' म्हणून आहे. पण आता त्या सोबतच 'बोगद्यांचे शहर' अशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने 'पाताळ लोक' अर्थात 56 भूमिगत बोगद्यांची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाची घोषणा केली आहे. येरवडा ते कात्रज दरम्यानच्या प्रमुख बोगद्यासह 54 किलोमीटरचे भुयारी जाळे विणले जाणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे पुणेकरांचा जमिनी खालून प्रवास सुकर होणार आहे.
पुण्यातील काही उड्डाणपुलांचे काम नियोजनाशिवाय झाल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात आता एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि बोगद्यांवर भर दिला आहे. शहरातील 32 मुख्य रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अडीच पट अधिक वाहतूक असल्याने हे रस्ते 'डी-कन्जेस्ट' करणे आवश्यक आहे. त्यासाठी 23 नवीन उड्डाणपूल आणि 56 बोगदे प्रस्तावित आहेत. त्यासाठी 32,000 कोटींचा प्रकल्पला मंजूरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प पुणेकरांसाठी गेमचेंजर ठरू शकतो.
हा प्रकल्प केवळ कात्रजपुरता मर्यादित नसून औंध, संगमवाडी, कोथरूड आणि सिंहगड रोड यांसारख्या वर्दळीच्या भागांना जोडणारा असेल. या प्रकल्पासाठी 32,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रिंग रोड पूर्ण झाल्यावर शहरातील 40 टक्के वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. पुण्याच्या ट्रॅफिकचा विषय निघाला की सर्वांच्या कपाळावर आठ्या येतात. पण आता ही कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. पुण्यात तब्बल 56 बोगदे बांधले जाणार आहेत.
येरवडा ते कात्रज हा प्रवास आता थेट जमिनीखालून होणार आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार असून मुख्यमंत्री कार्यालयाने याला हिरवा कंदील दिला आहे. रिंग रोडशी जोडणी होणार आहे. हे बोगदे थेट रिंग रोडला जोडले जातील, जेणेकरून महामार्गावर जाणारी वाहतूक शहरात न येता बाहेरच्या बाहेर जाईल. यामुळे पुण्यातील 40 टक्के ट्रॅफिकची समस्या कायमची मिटणार आहे. कात्रजचा घाट ओलांडताना होणारा त्रास आता कमी होणार असून, थेट बोगद्याद्वारे जलद प्रवास शक्य होणार आहे. रिंग रोड आणि हे बोगदे पुण्याच्या भविष्यातील वाहतुकीचा कणा ठरणार आहेत.
असा असेल पुण्याचा नवीन चेहरा
- 56 बोगदे: 54 किमी लांबीचे भुयारी मार्ग शहराच्या उत्तर-दक्षिण भागांना जोडणार.
- उड्डाणपूल: 23 नवीन उड्डाणपूल बांधणार, त्यापैकी 8 चे काम सुरू.
- 32 मुख्य रस्ते: या रस्त्यांवरील दीड ते अडीच पट वाढलेला भार कमी करणार.
- थ्री-लेअर ट्रॅफिक: खाली रस्ता, मध्ये कॉरिडॉर आणि त्यावर मेट्रो असे नियोजन.