यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Savitribai Phule Pune University Gas Crisis : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या गॅस तुटवड्यामुळे एक मोठे संकट उभे राहिले असून हजारो विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे विद्यापीठातील मेस आणि कॅन्टीनमधील गॅसचा साठा आता संपण्याच्या मार्गावर आहे. याबाबत माहितीनुसार, हा साठा फक्त शुक्रवार दुपारपर्यंतच पुरेल इतका मर्यादित आहे. यामुळे हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून त्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासनाने वेळेत तोगा काढला नाही, तर आम्ही थेट कुलगुरूंच्या घरी जाऊन जेवू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
विद्यापीठातील मेस बंद होणार?
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. पुरवठादारांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 15 ते 20 दिवस नवीन सिलेंडर उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे विद्यापीठ परिसरातील मेस आणि खानावळ्या केवळ एक ते दोन दिवसच चालवता येतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह क्रमांक 8 आणि 9 तसेच मुख्य रिफेक्टरीमध्ये दररोज सुमारे 3000 विद्यार्थी जेवण करतात. या सर्व विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: इराण-अमेरिका युद्धाची झळ डोंबिवलीला; MIDC मधील 70% उद्योग बंद होणार? )
विद्यार्थ्यांचा कुलगुरूंना थेट इशारा
जेवणाची व्यवस्था विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. मेस चालकांनी आधीच प्रशासनाला कळवले आहे की,गॅसअभावी जेवण तयार करणे अशक्य होणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. ही परिस्थिती ओळखून विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
गॅसची पर्यायी व्यवस्था झाली नाही आणि खानावळी बंद झाल्या, तर सर्व विद्यार्थी कुलगुरूंच्या निवासस्थानी जेवायला जातील, असा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे विद्यापीठ वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
( नक्की वाचा : Iran US War: कलाम यांनी 20 वर्षांपूर्वीच दिलेला इशारा ठरतोय खरा; आखाती युद्धाने भारताची 'ती' कमजोरी जगासमोर! )
प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेची अपेक्षा
सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यापीठात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याने अनेक मेस चालक खानावळी बंद करण्याच्या विचारात आहेत. हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरून पुण्यात येतात आणि त्यांचे पूर्णपणे अवलंबित्व या खानावळींवर असते. अशा वेळी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून गॅसचा पुरवठा सुरळीत करावा किंवा विद्यार्थ्यांसाठी जेवणाची दुसरी कोणती तरी सोय करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता यावर विद्यापीठ प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.