यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरती प्रक्रिया सध्या मोठ्या वादात सापडली आहे. विद्यापीठातील 111 जागांसाठी सुरू असलेल्या या प्रक्रियेत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा भाव फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर आरोपामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी कॅमेरासमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
5000 पदांची भरती
राज्यभरात सध्या प्राध्यापक भरतीला वेग आला असून एकूण 5000 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक क्षेत्रातील महाविद्यालयांमधील 111 पदांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 13 सप्टेंबर 2024 रोजी या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेत एटीआर (शैक्षणिक, संशोधन आणि अध्यापन तपशील) आणि आवश्यक एपीआय स्कोअर सादर करणे सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना अनेक उमेदवारांनी आपला एटीआर तपशील भरला नव्हता. अशा उमेदवारांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठाने अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली आहे. यासाठी 5 मे पर्यंत मुदत देण्यात आली असून तसे परिपत्रकही काढण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी ही सुधारणा केली आहे, त्यांनी अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे 9 मे पर्यंत विद्यापीठाच्या प्रशासन शिक्षक कक्षात जमा करणे बंधनकारक आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
मुदतवाढ आणि नवीन जाहिरातीसाठी उमेदवारांची मागणी
विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार सुमारे 9000 उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, यातील सुमारे 9 ते 10 हजार पात्र उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहिती अभावी वेळेत एटीआर तपशील भरता आलेला नाही.
नेट-सेट आणि पीएचडी धारक उमेदवारांनी ही मुदत अजून एक महिना वाढवून देण्याची मागणी केली आहे. तसेच, सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी, असा आग्रह धरणारे निवेदन उमेदवारांनी दिले आहे.
नोकरीवर गंडांतर येण्याची भीती
अनेक उमेदवारांनी एटीआर तपशील सादर न केल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठाने केवळ जुन्या अर्जात सुधारणा करण्याची मुभा दिली असून नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांनी आधी अर्ज केले नाहीत किंवा ज्यांच्याकडून त्रुटी राहिल्या आहेत, असे हजारो उमेदवार सध्या चिंतेत आहेत. कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपांमुळे या भरती प्रक्रियेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.