Pune's Iconic JM Road Completes 50 Years with Zero Potholes : येत्या 1 जानेवारी 2026 रोजी पुण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि गजबजलेला जंगली महाराज रस्ता म्हणजेच जेएम रोड आपल्या बांधकामाची 50 वर्षे पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या 50 पावसाळ्यांत या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. पन्नास पावसाळे अनुभवूनही या रस्त्याचा दर्जा आजही तसाच टिकून आहे, ही बाब आजच्या काळातील खराब रस्त्यांच्या पार्श्वभूमीवर आश्चर्यकारक मानली जाते.
मुंबईच्या रस्त्यांकडून मिळाली प्रेरणा
या रस्त्याच्या निर्मितीची कथा रंजक आहे. 'इंडियन एक्स्प्रेस' नं याबाबतचं सविस्तर वृत्त छापलं आहे. त्यानुसार 1973 मध्ये पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. त्यावेळी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट श्रीकांत शिरोळे कामानिमित्त मुंबईला जात असत. मुंबईतील रस्त्यांचा दर्जा पाहून त्यांनी तशाच पद्धतीचे रस्ते पुण्यात का असू नयेत असा विचार केला. त्यांनी सिव्हिल इंजिनिअर्सशी चर्चा केली आणि मुंबईतील रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान पुण्यात आणण्याचे ठरवले.
( नक्की वाचा : Pune News : 9 वीच्या मुलीनं चक्क शिक्षिकेला केलं प्रपोज, मैत्रिणीला वॉशरुममध्ये गाठले आणि... पुणे हादरले! )
10 लाख रुपयांचा खर्च आणि 10 वर्षांची गॅरंटी
शिरोळे यांनी या कामासाठी चर्चगेट येथील रेकोंडो या कंपनीशी संपर्क साधला. त्या काळी जेव्हा पेट्रोल 0.80 पैसे लिटर आणि सोने 400 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, तेव्हा या कंपनीने या रस्त्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम मोठी होती, तरीही शिरोळे यांनी 10 ऐवजी 15 लाख रुपये देण्याचे मान्य केले.
मात्र, कंपनीला एक अट घातली होती की 10 वर्षांपर्यंत रस्त्याला साधा तडाही जाणार नाही आणि जर काही झाले तर संपूर्ण रस्ता मोफत दुरुस्त करून दिला जाईल. या बदल्यात पालिकेने रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करण्याचे आश्वासन द्यायचे होते.
( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
कुणाचं आहे डोकं?
या रस्त्याच्या अभेद्य बांधकामामागे नॉर्मन हेन्री टेलर या ब्रिटीश इंजिनिअरचे डोके होते. 1903 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेले टेलर हे रेकोंडो कंपनीचे संस्थापक संचालक होते. त्यांनी सिंगापूरमध्येही काम केले होते आणि त्यांच्याकडे डांबरी रस्ते बनवण्याचे 3 जागतिक पेटंट होते. त्यांनी जेएम रोडसाठी हॉट मिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला.
यामध्ये डांबर आणि खडी 160 डिग्री सेल्सिअसवर गरम करून ते एकसारखे पसरवून दाबले जाते. यामुळे रस्ता टिकाऊ आणि क्रॅक-फ्री बनतो.
50 वर्षांचा यशस्वी प्रवास
1 जानेवारी 1976 रोजी हा 2.3 किलोमीटरचा रस्ता पुणे महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला होता. आज या रस्त्यावर मेट्रो धावते आहे, मोठ्या शोरूम्स आणि मॉल्स उभे राहिले आहेत, वाहतूक कैक पटीने वाढली आहे, तरीही मूळ रस्त्याचा दर्जा तसाच आहे. 2013-14 मध्ये यावर वरून थर देण्यात आला असला, तरी खोदकाम न करण्याच्या नियमामुळे हा रस्ता आजही सुस्थितीत आहे. 50 वर्षांचा हा प्रवास भारतातील इतर शहरांसाठी सर्वोत्तम उदाहरण आहे.