
मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी. लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवी. या उद्देशाने अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी एक विश्वविक्रम केला आहे. हा विश्वविक्रम सलग 51 मराठी पारंपारिक लावणी गायनाचा आहे. सलग 4 तास 45 मिनिटे पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून हा विश्वविक्रम केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनलच्या प्रतिनिधी नीता दोंदे टिपणीस यांनी या विश्वविक्रमाची नोंद घेतली. शिवाय प्रमाणपत्र आणि मेडल देऊन पुष्पा चौधरी यांचा सन्मान केला. पुष्पा चौधरी यांनी सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी सुरुवात करून दुपारी 2 वाजून 46 मिनिटांनी शेवटची 51 वी लावणी गायली.
लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी विश्वविक्रमाचा प्रयत्न केला. डिजेच्या काळात जुन्या पारंपरिक लावण्या मागे पडत आहेत. कलाकारांच्या माध्यमातूनच ही कला जिवंत राहणार आहे. यासाठी विश्वविक्रम करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्ण केला, असं यावेळी पुष्पा चौधरी म्हणाल्या. त्यांच्या स्वामिनी अकॅडेमी मधील गायकांनी कोरससाठी त्यांना साथ दिली. हा विश्वविक्रम कलेचा आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचाच असल्याचंही त्या म्हणाल्या.
पुण्यातील नामवंत वादक हर्षद गणबोटे यांच्या टीमनेही चौधरी यांना साथ दिली. गणबोटे यांनी सुरेखा पुणेकरांसोबत 15 वर्ष काम केलं आहे. तसेच उषा मंगेशकर यांच्या गाण्यांना साथ देणारे कुंभार यांनी सुंदर गिटार वाजवली.नेहमीच राया तुमची घाई, चला जेजुरीला जाऊ, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, कुण्या गावाचं आलं पाखरू, कळीदार कपूरी पान, खेळताना रंग बाई होळीचा, ढोलकीच्या तालावर, बुगडी माझी सांडली गं, अशी एकाहून एक सरस आणि गाजलेली लावणी गीते पुष्पा चौधरी यांनी यावेळी सादर केली. वॅलेंटीना वूमेन्स इम्पॉवेरमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world