Rain Update: मान्सून गायब, आठवडाभर कशी असेल स्थिती? हवामान विभागाची काळजी वाढवणारी अपडेट

Maharashtra Rain Alert : पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 ते 7 दिवस संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे, पुणे

महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिक सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, हवामान विभागाकडून एक महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी अपडेट समोर आली आहे. पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 ते 7 दिवस संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची तीव्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कालावधीत राज्यात कुठेही दमदार किंवा मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मान्सूनचे वारे अद्याप कमकुवत; परिस्थिती प्रतिकूल

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात मान्सूनचे वारे कोठेही सक्रिय नसल्याची स्थिती आहे. मान्सूनचे वारे अद्याप खूपच कुमकुवत असून, मान्सून पुढे सरकण्यासाठी किंवा सक्रिय होण्यासाठी सध्या कोणतीही चांगली परिस्थिती निर्माण झालेली नाही. "पुढील 5 ते 7 दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही. मान्सूनचे वारे सध्या खूपच कमकुवत आहेत. राज्यात सर्वत्र पावसाची प्रतीक्षा कायम राहील", असा अंदाज सानप यांनी वर्तवला. 

Advertisement

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

1 ते 8 जुलै दरम्यान निर्माण झाली होती पोषक स्थिती

यापूर्वी, चालू महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ते 8 जुलै दरम्यान मान्सूनसाठी अत्यंत पोषक आणि चांगली परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, हा जोर ओसरल्यानंतर मान्सून पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला आहे.

पाऊस गायब होण्यामागे 'एल निनो'चा प्रभाव

पाऊस अचानक गायब होण्यामागे जागतिक हवामान बदल आणि प्रशांत महासागरातील हालचाली कारणीभूत ठरल्या आहेत. एल निनोचा सध्या तीव्र प्रभाव असल्याची अधिकृत माहिती देखील पुणे हवामान विभागाने दिली आहे. एल निनोच्या या प्रभावामुळे मान्सूनचे वारे मंदावले आहेत. परिणामी, ढग निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असून मान्सूनला गती मिळत नाही.

(नक्की वाचा-  KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांची कामे वेगाने उरकून घेतली होती. मात्र, आता पेरण्या पूर्ण झाल्यावर ऐन पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने ओढ दिली आहे. पुढील 5 ते 7 दिवस पाऊस पडणार नसल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे आता बळीराजाची चिंता अधिकच वाढली आहे. पिके वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना केवळ विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.