- विरार शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात अनेक जण अडकले होते.
- अग्निशमन दलाने विविध भागातून एकूण 222 नागरिकांना सुरक्षित स्थळी यशस्वीपणे हलविले आहे
- राजावळी परिसरात सर्वाधिक बचावकार्य झाले असून तिथून 100 लोकांना सुटका करण्यात आली आहे
मनोज सातवी
वसई-विरार शहरात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. सखल भाग आणि ग्रामीण परिसरात त्यामुळे अनेक जण अडकून पडले होते. त्यातील जवळपास 222 नागरिकांची अग्निशमन दलाने यशस्वीपणे सुटका केली आहे. राजावळी, मधुबन, निर्मळ, सकवार, सारजा मोरीगाव, संतोष भवन, विराटनगर, सुंदरनगर, वसई स्टेशन व सातीवली-आचोळे परिसरातून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असल्याने वसई विरारमध्ये परिस्थिती बिघडली होती. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. त्याचा फटका सर्व सामान्यांना बसला.
एकीकडे 222 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दुसरीकडे राजावळी वाघराळपाडा येथे पुराच्या पाण्यात पोहत असताना 55 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली आहे. त्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार भोगाव येथे स्थानिक तरुणांना लाईफ जॅकेटचे वाटप करून बचावकार्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. शिवाय घरा बाहेर न पडण्याचे आवाहन ही केले आहे.
शहरातील सखल भागात आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक जागच्या जागी अडकून पडले होते. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विविध भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक बचावकार्य राजावळी परिसरात झाले आहे. जिथून 100 जणांची सुटका करण्यात आली. याशिवाय मधुबनमधून 41, निर्मळमधून 30, सकवारमधून 19, सारजा मोरीगावातून 12, संतोष भवनमधून 10, विरारच्या विराटनगर आणि सुंदरनगर परिसरातून 5, वसई स्टेशन भागातून 3, तर सातीवली ते आचोळे दरम्यान 2 अशा एकूण 222 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
पुढचे दोन दिवस ही मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरीत जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसेल तर नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असं ही सांगण्यात आलं आहे. शनिवारी झालेल्या पावसात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी घरं, झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी घरात राहावे. लहान मुलांना बाहेर पाठवू नये अशा सुचना करण्यात आल्या आहेत.