Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं कमबॅक झालं आहे. पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई पुण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी हलका पावसाला सुरुवात झाली आहे.
मुंबई, ठाण्यात देखील पुढील 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. हवामान विभागाने सकाळी 10.30 वाजता हा इशारा जारी केली आहे. मुंबई पोलिसांनी ही सोशल मीडियावर नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन केलं आहे.
रायगडमध्ये नद्यांना पूर
महाबळेश्वर परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत असल्याने तेथून आलेल्या पाण्यामुळे सावित्री व गांधारी नदीला पूर यण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2.30 वाजता दुपारी 4-5 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे. यामुळे खाडी क्षेत्रातील सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, गोरेगाव येथून प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. रेस्क्यू टीम्सना देखील सतर्क राहण्यास सांगितले आहे.
महाड शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून पोलादपूर शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासूनच जोरदार पावसामुळे जिल्ह्याचा दक्षिण भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रत्नागिरीतही पावसाची एन्ट्री
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. संगमेश्वर तालुक्यात 24 तासांत तब्बल 142 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कसबा, शास्त्री पुल भागाला पावसाने जोरदार झोडपलं आहे. त्यामुळे शास्री नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. पावसाचा जोर असाच राहिला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात पावसाची संततधार
कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने थोडीशी विश्रांती दिलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. पंचगंगा नदीची घटलेल्या पाणी पातळीत पुन्हा एक फुटाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचं प्रमाण वाढलं आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.