एकीकडे उत्तर प्रदेशातील संभलमध्ये जामा मशिदीवरुन गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे राजस्थानच्या अजमेर शरीफवरुन मोठा वाद उभा राहिला आहे. अजमेरच्या एका स्थानिक न्यायालयाने त्या याचिकेवर सुनावणी देण्यास मंजुरी दिली आहे. राजस्थानातील दर्गा एका शिवमंदिरा जागेवर उभारण्यात आला आहे, असा दावा करीत हिंदू सेनेने न्यायालयात धाव घेतली आहे.
नक्की वाचा - धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास मंजुरी दिल्यानंतर संबंधित पक्षांना नोटीस जारी करीत उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेरच्या मुन्सिफ न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यांची आपल्या याचिकेत एका पुस्तकातील दाव्याचा पुरावा दिला आहे. 1911 मध्ये हरबिलास सादरा यांनी हे पुस्तक लिहिलंय. ज्या पुस्तकाचं नाव अजमेर : हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव आहे. इंग्रजीत लिहिलेलं 168 पानी पुस्तकात दरगाह ख्वाजा मोहिनुद्दीन चिश्ती नावाचं एक प्रकरण आहे. या प्रकरणात ख्वाजा यांचा जीवनकाळ आणि त्यांच्या दर्ग्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पान क्रमांक 93 वर लिहिल्यानुसार, बुलंद दरवाज्याच्या उत्तरेकडे तीन मजली छत्रीच्या आकाराचं बांधकाम आहे, ते बांधकांम हिंदू इमारतीच्या काही भागापासून तयार करण्यात आलं आहे. छत्रीच्या आकाराच्या बांधकाम हिंदू मूळ असल्याचं वाटतं. त्याच्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं असून रंगदेखील भरण्यात आले आहेत.
पान क्रमांक 96 वर लिहिलं आहे की, बुलंद दरवाज्याच्या आतील अंगणाच्या खाली जुनं हिंदू मंदिराचं तळघर आहे. तेथील अनेक खोल्या अद्यापही त्याच परिस्थितीत आहेत. सुरुवातीच्या काळात मुस्लीम शासकाने या संपूर्ण दर्ग्याचं बांधकामं जुन्या हिंदू मंदिरांवर केलं आहे. पुढल्या पानावर लिहिलंय, परंपरेनुसार तळघराच्या आत एका मंदिरात महादेवाची प्रतिमा आहे. येथे दररोज एका ब्राम्हण कुटुंबाकडून चंदन ठेवलं जात होतं. आता याचिकाकर्त्यांनी या पुस्तकाचा पुरावा देत कोर्टात धाव घेतली आहे.