Ramesh Mhatre Case Twist: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाला आता एक अत्यंत संशयास्पद आणि राजकीय वळण मिळाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक तर केली, पण अटकेनंतर अवघ्या काही वेळातच सुरू झालेलं 'आजारी' पडण्याचं नाट्य अजूनही संपलेलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुवारी दुपारी 12 वाजता रमेश म्हात्रे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता, पण ऐनवेळी डॉक्टरांनी आपला निर्णय बदलला. त्यामुळे महिला डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या या सत्ताधारी पक्षातील नेत्याला वाचवण्यासाठी पडद्यामागून नेमक्या कोणत्या मोठ्या शक्ती कार्यरत आहेत? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर कोणाचा दबाव?
या संपूर्ण प्रकरणात आता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भूमिका अत्यंत संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. म्हात्रे यांना दुपारी 12 वाजता डिस्चार्ज मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते, पण अचानक असे काय घडले की डॉक्टरांनी आपला निर्णय फिरवला? ऐनवेळी रमेश म्हात्रे यांची तब्येत इतकी कशी खालावली, की त्यांना डिस्चार्ज नाकारण्यात आला? या सर्व घडामोडींमुळे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर सत्ताधाऱ्यांमधील कोणाचा तरी मोठा दबाव आहे का, अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीत गुंडशाही जिंकली, डॉक्टर हरले! 'त्या' पीडित डॉक्टरचा थेट राजीनामा; शहरही सोडलं )
दुसरीकडे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून म्हात्रे यांच्या आरोग्याबाबतचे कोणतेही मेडिकल सर्टिफिकेट देण्यास कमालीची टाळाटाळ केली जात आहे. जोपर्यंत ठोस मेडिकल रिपोर्ट समोर येत नाही, तोपर्यंत पोलिसांना पुढील कायदेशीर पावले उचलता येत नसल्याने पोलिसांचीही अडचण झाली आहे. कायदा आणि न्यायालयाच्या कचाट्यातून म्हात्रे यांना वाचवण्यासाठीच हे वैद्यकीय कारण पुढे करून वेळकाढूपणा केला जात असल्याचा संशय आता बळावला आहे.
चौफेर दबावानंतर झाली होती अटक
हे संपूर्ण प्रकरण 6 जुलै रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये घडले होते. एका नवजात बालकासाठी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग म्हणजेच एनआयसीयू फुल्ल असल्यामुळे डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. याच कारणावरून नातेवाईकांनी रमेश म्हात्रे यांना बोलावले.
( नक्की वाचा : डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक झालेले रमेश म्हात्रे कोण आहेत? वाचा डोंबिवलीतील मातब्बर नेत्याचा संपूर्ण इतिहास )
म्हात्रे यांनी रुग्णालयात घुसून तिथल्या महिला डॉक्टरला पाठीमागून येत अत्यंत जोराने मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत होता. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर येऊन 24 तास उलटले तरी सत्ताधारी पक्षाचा नेता असल्याने म्हात्रे यांना अटक केली जात नव्हती. मात्र, एनडीटीव्ही मराठीने हे प्रकरण सातत्याने लावून धरल्यानंतर आणि सर्व बाजूंनी दबाव वाढल्यानंतर अखेर पोलिसांनी बुधवारी 8 जुलै 2026 रोजी संध्याकाळी म्हात्रे यांना अटक केली.