Pune News: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीचं नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप, प्रतिक्रिया येत असताना, पत्नी रोहिणी खडसे मात्र गप्प होत्या. मात्र तब्बल 24 तासांनंतर रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी सावध आणि संयमी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबत एक फोटो एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. सोबत ट्वीटमध्ये म्हटलं, "कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र!"
एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया?
"सध्याच्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज मला थोडा थोडा येत होता. मी फारसे त्यावर बोलणार नाही. अलिकडे ज्या काही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे त्या मी तुमच्याच माध्यमातून पाहत आहे. माझे त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलणे झाले नाही. मात्र जर ती खरचं रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई जर त्या पार्टीमध्ये गुन्हेगार असतील तर मी त्यांचे समर्थन करणार नाही," असं एकनाथ खडसे यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील खराडी भागामध्ये एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरु असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. या माहितेच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. यावेळी रेव्ह पार्टी करणाऱ्या तीन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले. पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अंमली पदार्थ, हुक्का, दारु, जप्त करण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजे यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याचा देखील समावेश असल्याचे उघडकीस आले. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.