सुरज कसबे, प्रतिनिधी
Khandala Ghat: खंडाळा घाटातील निसर्गरम्य प्रवासात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीने प्रवाशांच्या मनात धडकी भरली होती. रात्रीच्या वेळी या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता या बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली असून, त्यांच्या मदतीला एक अत्याधुनिक आणि खास बनावटीचा पिंजरा धावून आला आहे.
दहशतीतून सुटका करण्यासाठी खास पाऊल
खंडाळा घाट आणि खोपोली परिसरात बिबट्याचा वावर वारंवार दिसून येत होता. घाटातील वळणांवर बिबट्याचे दर्शन होत असल्याने वाहनचालकांमध्ये घबराट पसरली होती. ही गंभीर परिस्थिती ओळखून खोपोली हेल्प फाउंडेशनने पुढाकार घेतला. वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी अहिल फेन्स अँड गॅबल्स यांच्या माध्यमातून एक विशेष पिंजरा तयार करून घेतला आहे. या उपक्रमामुळे घाटातील प्रवास आता अधिक सुरक्षित होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )
बिबट्या इजा न होता होणार जेरबंद
या नवीन पिंजऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची तांत्रिक रचना. बिबट्याला पकडताना त्याला कोणतीही शारीरिक जखम किंवा इजा होणार नाही, याची विशेष काळजी या रचनेत घेण्यात आली आहे. वनविभागाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हा पिंजरा बनवण्यात आला असून, नुकतेच त्याचे लोकार्पण करण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात सोडणे वनविभागाला शक्य होणार आहे.
( नक्की वाचा : Bharat Mata Cinema: लालबागच्या'भारतमाता'मध्ये पुन्हा पडणार मराठी पाऊल; मल्टिप्लेक्सची मजा आता साध्या दरात )
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खोपोली हेल्प फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. घाट परिसरात आता हा पिंजरा तैनात करण्यात आला असला, तरी प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाटात विनाकारण थांबू नये. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना अधिक सतर्क राहावे. वन्यजीवांचे संरक्षण आणि मानवी सुरक्षा यांचा समतोल राखण्यासाठी या अत्याधुनिक साधनाची मोठी मदत होणार आहे.