जाहिरात

Bharat Mata Cinema: लालबागच्या'भारतमाता'मध्ये पुन्हा पडणार मराठी पाऊल; मल्टिप्लेक्सची मजा आता साध्या दरात

Bharat Mata Cinema: लालबाग आणि परळ परिसरातील गिरणी कामगारांच्या आठवणींना उजाळा देणारे हे चित्रपटगृह नव्या आधुनिक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Bharat Mata Cinema: लालबागच्या'भारतमाता'मध्ये पुन्हा पडणार मराठी पाऊल; मल्टिप्लेक्सची मजा आता साध्या दरात
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Bharat Mata Cinema: मुंबईच्या गिरणगावातील संस्कृतीचा आणि मराठी अस्मितेचा महत्त्वाचा मानबिंदू असलेल्या भारतमाता सिनेमागृहाचे पडदे अखेर 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा उघडले आहेत. लालबाग आणि परळ परिसरातील गिरणी कामगारांच्या आठवणींना उजाळा देणारे हे चित्रपटगृह नव्या आधुनिक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दक्षिण मुंबईतील मराठी प्रेक्षकांसाठी हे हक्काचे ठिकाण असल्याने, या चित्रपटगृहाचे पुनरागमन सर्वांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे.

ऐतिहासिक वारसा आणि प्रवासाची गोष्ट

मुंबईतील लालबाग, परळ, काळाचौकी, भोईवाडा आणि भायखळा यांसारख्या भागातील मराठी संस्कृतीच्या ज्या काही मोजक्या खुणा शिल्लक आहेत, त्यापैकी भारतमाता हे एक महत्त्वाचे नाव आहे. या चित्रपटगृहाचा प्रवास 1941 मध्ये सुरू झाला होता, मात्र त्यावेळी त्याचे नाव लक्ष्मी टॉकीज असे होते. कालांतराने हे चित्रपटगृह मराठी चित्रपटांचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले.

दादा कोंडके यांचे गाजलेले सर्व चित्रपट असोत किंवा माहेरची साडी यांसारख्या चित्रपटांनी मिळवलेले यश असो, या सर्व सुवर्णयुगाचा साक्षीदार हे चित्रपटगृह राहिले आहे. अनेक चित्रपटांनी येथे 100 दिवसांहून अधिक काळ चालण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.

( नक्की वाचा : Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व )

आधुनिक सोयींनी युक्त नवे रूप

मराठी चित्रपटांच्या वैभवाचा काळ अनुभवलेले हे चित्रपटगृह 2018 पासून काही तांत्रिक कारणांमुळे बंद होते. आता मुक्ता ए2 आणि वन सिनेमाज यांनी एकत्रितपणे या चित्रपटगृहाचा कायापालट केला आहे. प्रेक्षकांना आता येथे अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा, 409 इतकी आसन क्षमता आणि अत्यंत आरामदायी सीट्स पाहायला मिळतील. विशेष म्हणजे, तांत्रिक सुधारणा करताना या वास्तूचा ऐतिहासिक वारसा आणि मूळ ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.

नव्या युगाचा चित्रपट अनुभव

नव्या रूपातील भारतमाता सिनेमामध्ये प्रेक्षकांसाठी डॉल्बी सराउंड साउंड आणि 2के लेझर प्रोजेक्शनची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाचा आवाजी आणि दृश्य अनुभव अधिक स्पष्टपणे घेता येणार आहे. याशिवाय, लक्झरी रिक्लायनर्स आणि सोफा सीटिंगमुळे चित्रपट पाहण्याची मजा द्विगुणित होणार आहे. खाद्यपदार्थांच्या सुविधेतही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली असून, येथील वातावरण प्रेक्षकांना अधिक सुखद अनुभव देणारे ठरेल.

( नक्की वाचा : IAS Officers Transfer : बदलीचा धमाका! राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर )

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे दर

आजच्या काळात मल्टिप्लेक्समधील महागड्या तिकीट दरामुळे सामान्य प्रेक्षक त्रस्त असताना, भारतमाता सिनेमागृहाने मात्र आपले दर माफक ठेवण्यावर भर दिला आहे. तिकिटांचे दर आणि खाद्यपदार्थांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील अशा ठेवल्या गेल्या आहेत. चित्रपटगृह पुन्हा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. गिरणगावातील तीन पिढ्यांशी नातं सांगणाऱ्या या जागेबद्दल आपल्या मनात एक वेगळीच आपुलकी आणि आस्था असल्याची भावना यावेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी व्यक्त केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com