वेदनेला पुरस्कार... शिंप्याच्या 'उसवणी'च्या वेदनेला साहित्याचा सन्मान!

देविदास सौदागरच्या पहिल्याच कादंबरीला मानाचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याची उसवण अधिक प्रकर्षाने भरू आणि बहरू लागली.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

प्रतिनिधी, सौरभ नाईक

तुळजापूरमधल्या चार पत्र्यांच्या खोलीत एक चाक अविरत फिरतं आहे.  हे चाक उसवलेल्या समाज व्यवस्थेला जोडतंय ते आपल्या शब्दांच्या धाग्याने. परिवर्तनाच्या काळात समानतेचा धागा जोडू पाहणारी ही ‘उसवण‘ साहित्य अकादमीला भावली आणि ‘देविदास सौदागर‘ लिखित उसवणला मिळाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार..देविदास सौदागरच्या पहिल्याच कादंबरीला मानाचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आणि त्याची उसवण अधिक प्रकर्षाने भरू आणि बहरू लागली. देविदास हा मूळचा तुळजापूरचा. शाळेची पायरी अभावानेच चढला असेल, पण आयुष्याच्या पायऱ्या सर करताना जराही अडखळला नाही. पेशाने शिंपी.. त्यामुळे फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावणं त्याच्यासाठी नवं नव्हतं. पण ह्याच आयुष्याला शब्दरूप केलं आणि निर्माण झाली त्याची पहिली कादंबरी उसवण.. 

वरवर पाहता ही शिंप्याच्या पराभवाची, दुःखाची कहाणी वाटत असली तरी ही कहाणी वास्तवतेची आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात शिंप्याकडे जाताना जरा पावलं अडखळतातच. त्यात हवे त्या मापाचे आणि हवे तसे कपडे घरबसल्या विकत घेता येत असल्याने हा व्यवसाय चालायचा कसा? शहरी भागात शिंप्याचा डिझायनर झाला आणि ग्रामीण भागात त्याच शिंप्याला अस्तित्वासाठी झगडावं लागतं आहे. ह्याची ही कथा आहे. आणि प्रत्येक कथेला जसा नायक असतो, तसंच आयुष्याच्या खऱ्या कथेत नायकाच्या मागे एक खरीखुरी नायिका असते. देविदासच्या नायिकेला जेव्हा पुरस्काराबद्दल कळलं तेव्हा तिला आनंदाश्रु अनावर झाले.. वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नाही हे देविदास यांचं वाक्यच.. पुरस्कारातून आलेली जबाबदारी दाखवत आणि सोबतच युवा लेखक म्हणून सरकार दरबारी असलेल्या अपेक्षा देखील व्यक्त करतं, परिस्थिती प्रतिकूल असली तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये असं देविदास यांचं म्हणणं आहे.

Advertisement

नक्की वाचा - अलका याज्ञिक यांना झालेला कानाचा आजार नेमका काय आहे? लक्षणे काय आहेत?

देविदासला पुरस्कार प्राप्त झाल्याने गावात आनंदाचं वातावरण आहे, महिला औक्षण करतायत, गावकऱ्यांमध्ये आनंद आहे. चार पत्र्यांच घर आनंदाने ओसंडून वाहत आहे. पण अजूनही प्रश्न तोच आहे. ह्या पुस्तकाने एका नव्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. 116 पानांची ही कादंबरी देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केली आहे. 160 रुपयांची ही कादंबरी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. देविदासच्या लेखणीला नवनव्या प्रश्नांचे धुमारे फुटत राहोत आणि लेखणी अधिक बहरत जावो ह्या शुभेच्छा !! 

Advertisement
Topics mentioned in this article