बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पुन्हा एकदा एका अनोळखी व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 20 मे ला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी घडली. या प्रकरणी छत्तीसगडमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्याच्या घराच्या सुरक्षेसोबतच मुंबई पोलिसांनी त्याची वैयक्तिक सुरक्षाही वाढवली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सलमानच्या घरी बेकायदेशीरपणे घुसलेल्या व्यक्तीबद्दल गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सलमानच्या जीवाला कोणताही धोका नाही. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत. तर, सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्याला फक्त सलमानला भेटायचे होते. परंतु पोलिसांनी त्याला भेटू दिले नाही. म्हणून त्याने त्याला लपून मिळण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सूत्रांनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात त्याने सांगितले की, 20 मे रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी एक अनोळखी व्यक्ती गॅलेक्सी अपार्टमेंटच्या आसपास फिरताना दिसला. त्याला समजावून तेथून जाण्यास सांगितले असता, या घटनेमुळे संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने आपला मोबाईल फोन जमिनीवर फेकून तोडला. असं जबाबात सांगण्यात आलं आहे.
यानंतर, संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी तोच अनोळखी व्यक्ती पुन्हा गॅलेक्सी अपार्टमेंटच्या मुख्य गेटवर आला. इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या गाडीतून आत घुसला. त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुर्वे, म्हेत्रे, पवार आणि सुरक्षा रक्षक कमलेश मिश्रा यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या व्यक्तीचे नाव जितेंद्र कुमार हरदयाल सिंह असून तो 23 वर्षांचा आहे. तो छत्तीसगडचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मला सलमान खानला भेटायचे आहे, पण पोलीस मला भेटू देत नाहीत, म्हणून मी लपून त्याला भेटण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितले.
या व्यक्तीव्यतिरिक्त, 22 मे रोजी एका महिलेनेही सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेलाही मुंबई पोलिसांनी पकडले असून तिची चौकशी सुरू आहे. ही महिला मुंबईची रहिवासी आहे की, दुसऱ्या शहरातून आली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांत ही दुसरी घटना आहे. त्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीने सलमान खानच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांनाही सलमान खानला भेटायचे होते. त्यामुळे ते त्याच्या इमारतीत घुसल्याचे त्यांनीच सांगितले आहे. दरम्यान हे दोघे सलमानचे चाहते आहेत की, यामागे काही वेगळेच कारण आहे, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.