देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pandharpur News : पंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा (Mauli Palkhi) आज पुणे जिल्ह्यात (Pune News) दाखल झाला आहे. पुणे जिल्ह्यातील नीरा नदीकाठच्या नीरा शहरामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आगमन सकाळी 9 वाजता झाले. तत्पूर्वी नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना परतीचं स्नान घालण्यात आलं.
'माऊली माऊली'चा गजर करत वरूण राजाच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आलं. यानंतर हा पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी नीरा येथील विठ्ठल मंदिरात विसावला आहे.
नक्की वाचा - Pune Crime : पुण्यातील चोरांची चर्चा! महादेवाचा घेतला आशीर्वाद अन् दानपेटीतील पैसे केले लंपास
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतीच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते. माऊलींच्या पादुकांचे नीरास्नान झाल्यानंतर रथापुढे आणि रथा मागे चालणाऱ्या वारकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणी माऊलींच्या पादुका नेऊन त्यांना स्पर्श दर्शन देण्याची परंपरा आहे. गेल्या वर्षी या वारकऱ्यांना या स्पर्श दर्शनाचा लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे वारकऱ्यांनी माऊलींचा रथ अडवला होता. मात्र यावर्षी कोणताही वाद-विवाद तंटा न होता वारकऱ्यांना माऊलींच स्पर्श दर्शन मिळाले आणि वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.