महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या विचारांशी बांधील राहिलेले आणि मुंबईतील पक्षाचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर 'जय महाराष्ट्र' करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षांतरामुळे केवळ मनसेलाच नव्हे, तर नुकत्याच आकाराला आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीलाही मोठा धक्का बसला आहे. धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना केलेले आरोप राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत.
नक्की वाचा: BMC ELection 2026: संतोष धुरी स्वार्थी! वरळीत बसलेल्या धक्क्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या मनसेचा उद्धव ठाकरेंनी ताबा घेतलाय!
संतोष धुरी हे 2007 मध्ये शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मागे उभे राहिलेल्या त्या पहिल्या पिढीतील कार्यकर्ते आहेत, ज्यांनी मनसे बळकट व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले. शिवसेनेतून राज ठाकरेंसोबत बाहेर पडण्यापासून नगरसेवक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा राहिला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी अत्यंत जळजळीत शब्दात आपली व्यथा मांडली. संतोष धुरी यांनी म्हटले की, "आम्ही एका झेंड्याखाली होतो, आमचे भगवे रक्त आहे. पण आज मनसेची जी युती सुरू झाली आहे, ती अशा लोकांशी झाली आहे ज्यांचे विचार हिरव्या लोकांशी जोडलेले आहेत. राज ठाकरेंनी आपला पक्ष पूर्णपणे सरेंडर केला आहे,"
संतोष धुरी यांच्या नाराजीचे खरे कारण काय?
धुरी यांनी केलेल्या आरोपांनुसार, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात मनसेच्या ताकदीचा विचारच केला गेला नाही. "माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडूपमध्ये आमची ताकद मोठी आहे. तिथे आम्ही 2-2 जागांची मागणी केली होती, पण तिथे एका एका जागेवर आमची बोळवण केली गेली. प्रकाश पाटणकरांसारख्याकडून त्याचा वॉर्डही काढून घेण्यात आला. ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता मातोश्रीच्या अटी मान्य केल्या आणि त्यांना हवे ते प्रभाग घेऊ दिले असं धुरींनी म्हटलंय.
नक्की वाचा: BMC election 2026 : मुंबई महानगरपालिकेत जंगी लढत; 227 प्रभाग, 1700 उमेदवार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
धुरी,देशपांडे दिसता कामा नयेत, मातोश्रीचे आदेश!
पक्षांतरामागचे सर्वात धक्कादायक कारण सांगताना धुरी म्हणाले की, मातोश्रीवरून (उद्धव ठाकरे यांच्याकडून) असा स्पष्ट तह झाला होता की संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे कुठेही दिसता कामा नयेत, ना उमेदवारीमध्ये, ना प्रचारात. या अटीला संमती दिल्याचे दिसू लागल्याने आपल्याचा धक्का बसल्याचे संतोष धुरी यांनी म्हटले आहे. संदीप देशपांडे यांनी मोठ्या मनाने हा अन्याय सहन केला असला, तरी स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मला हे मान्य नव्हते. उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे आहेत, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. धुरी यांनी म्हटले की, आम्ही हिंदुत्वासाठी अंगावर केसेस घेतल्या. आम्हाला एक- दीड महिना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने पळवलं, खोटे गुन्हे दाखल केले. आम्हाला इतका त्रास दिला, आम्ही या सगळ्या गोष्टी विसरलो. पण या लोकांनी आमचे 6 नगरसेवक पळवले. आमच्या लोकांना त्रास दिला, अविनाश जाधवसारख्याला ठाण्यात त्रास दिला. ही सल आपल्या मनात अजूनही कायम असल्याचे धुरी यांनी बोलून दाखवले.