मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून प्रचार रंगात येऊ लागला आहे. मुंबईमधील मराठी बहुल पट्टा हा निर्णायक ठरणार असून, वरळीसारख्या भागात राज ठाकरे यांच्या मनसेला धक्का बसला आहे. माजी नगरसेवक आणि कडवट निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. 6 जानेवारीला दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्यांचा भाजपप्रवेश होणार आहे. 5 जानेवारी रोजी रात्री उशिरा संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ज्यामुळे वरळीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष धुरी यांच्या या निर्णयावर मनसेची पहिली प्रतिक्रिया आली असून मनसे नेत्यांनी धुरी यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यास सुरूवात केली आहे.
नक्की वाचा: BMC Election 2026: देवेंद्र फडणवीसांनी वरळीत गेम फिरवला, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना मोठा धक्का
स्वार्थी मानसिकता, मनसेची संतोष धुरींवर टीका
संतोष धुरी यांनी पक्ष सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयासंदर्भात बोलताना मनसेचे प्रभाग क्रमांक 192 मधील उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय की, "पक्षाने आजवर संतोष धुरी यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यांच्यावर विश्वास टाकला. मात्र केवळ एक तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी पक्षाची साथ सोडणे, हे त्यांच्या स्वार्थी मानसिकतेचे दर्शन घडवते."
नक्की वाचा: संदीप देशपांडेंशी घट्ट मैत्री, राज ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे संतोष धुरी कोण आहेत?
उमेदवारी न मिळाल्याने नाराजी
वरळीतील वॉर्ड क्रमांक 194 मधून धुरी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली आणि निशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली. यामुळे संतोष धुरी हे नाराज झाले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला आहे. धुरी यांना भाजपमध्ये नेमकी काय जबाबदारी दिली जाते, याकडे आता त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागलेले आहे. किल्लेदार यांनी धुरी यांच्यावर टीका करतानाच भाजपवरही टीका केली. त्यांनी म्हटले की, आम्हालाही कधीकाळी तिकीट मिळाले नव्हते, पण आम्ही कधी पक्षाशी गद्दारी केली नाही. राजकारणात आता नीतिमत्ता उरली नाहीये. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे सक्षम कार्यकर्ते उरलेले नाहीत. त्यामुळेच ते मनसेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून आपल्याकडे खेचत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world