यशपाल सोनकांबळे, पुणे
नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होणाऱ्या पालकांना यंदा महागाईची मोठी झळ सोसावी लागणार आहे. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाचे वाढलेले भाव आणि देशात डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किमती, तसेच कागदाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ, याचा थेट फटका आता शालेय साहित्याला बसला आहे. यंदा शालेय साहित्याच्या खरेदी दरांमध्ये थेट 20 ते 25 टक्क्यांची मोठी वाढ झाली असून, याचा थेट आर्थिक भुर्दंड सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
जून महिन्यापासून शाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये वह्या, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक वस्तूंचे भाव कडाडले आहेत. भाववाढ झाली असली तरी मुलांच्या शिक्षणासाठी शालेय साहित्य खरेदी करावेच लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, सरकारने या वाढत्या किमतींकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
(नक्की वाचा- पुणे पोर्शे अपघात प्रकरणात; अग्रवाल कुटुंबाचा माज कायम! जेलमधून बाहेर आल्यानंतरचा संतापजनक VIDEO व्हायरल)
वाहतूक खर्च दुपटीने वाढला; वह्यांच्या किमती गगनाला
कच्चा माल महागला: मागील काही महिन्यांत कागदाच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि पल्पच्या किमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी वाढ झाली आहे.
वाहतूक खर्चात वाढ: देशातील इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च दुपटीहून अधिक वाढला आहे. परिणामी, मे महिन्याच्या सुरुवातीलाच वह्यांच्या किमतींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
पूरक साहित्याचे दर वाढले: शालेय स्तरावर पाठ्यपुस्तकांसोबतच गाईड, वर्कबुक, आणि होमवर्कसाठी लागणाऱ्या इतर पूरक साहित्यांच्या किमतीतही तुर्तास 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
(नक्की वाचा- Pune Jamavbandi: पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवस जमावबंदी लागू! महापालिकेकडून गाईडलाईन्सही जारी)
शालेय गणवेशही महागले
केवळ वह्या-पुस्तकेच नाही, तर शालेय गणवेशाचे भावही यंदा चांगलेच कडाडले आहेत. गणवेशासाठी लागणाऱ्या कापडाच्या किमती वाढल्या आहेत, तसेच ते तयार करणाऱ्या कारागिरांची मजुरी वाढल्याने यंदा गणवेशाचे भाव 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा फटका सर्वसामान्य नागरिक सहन करत आहेत, त्यातच आता मुलांचे शालेय साहित्यही महागल्याने पालकांना दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत असून मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे.