उद्धव ठाकरेंवर झाली अँजिओप्लास्टी, हृदयात होते ब्लॉकेज, हॉस्पिटलमध्ये दाखल!

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Uddhav Thackeray Hospitalized : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्यावेळी झालेल्या तपासणात त्यांच्या हृदयात ब्लॉकेज आढळले आहे. सोमवारी (14 ऑक्टोबर 2024) सकाळी 8 वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी झालेल्या तपासणीनंतर उद्धव ठाकरेंची सुरुवातीला अँजिओग्राफी आणि नंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ठाकरे यांची यापूर्वीही अँजिओप्लास्टी सर्जरी झाली आहे.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. सोमवारी सकाळी बरं वाटत नसल्यानं ठाकरे हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले होते. त्यानंतर झालेल्या तपासणीनंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांच्या मानेच्या दुखण्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित ऑपरेशन करण्यात आले होते. या ऑपरेशनंतर बरं होण्यास त्यांना काही आठवडे लागले. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे डॉक्टर त्यांना किती दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देतात याकडं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

( नक्की वाचा : निर्णयांचा धडका आणि घोषणांचा पाऊस, महायुती सरकारनं घेतले आणखी 15 निर्णय )

दसरा मेळाव्यात केलं होतं भाषण

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात भाषण केलं होतं. केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा सगळ्यांनी मिळून उद्धव ठाकरेला नेस्तनाबूत करायचे ठरवले आहे. मात्र मला त्याची पर्वा नाही. सगळ्यांच्या छाताडावर बसून भगवा (Uddhav Thackeray Dusara Melava) फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान उद्धव ठाकरे यांना विरोधकांना दिलं होतं.