Shraddha Walkar Murder: श्रद्धा वाळकर हत्याकांडात चार वर्षे उलटल्यानंतरही न्याय का मिळत नाही, असा संतप्त आणि अत्यंत भावनिक सवाल तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. मुख्य आरोपी आफताब पूनावाला हा वेगवेगळी वैयक्तिक कारणे आणि तुरुंगातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याच्या नावाखाली न्यायालयीन सुनावणी टाळत असून, यामुळे खटल्याला कमालीचा उशीर होत आहे.
श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी लढा देणारे तिचे वडील विकास वाळकर यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये निधन झाले. दुःखद बाब म्हणजे अद्याप श्रद्धाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यासाठी तिचे अवशेषही कुटुंबाला मिळालेले नाहीत. एका बापाने न्यायाच्या प्रतीक्षेत प्राण सोडले, तरीही आरोपीला मिळणाऱ्या सवलतींमुळे खटल्याचा वेग मंदावला असल्याचे समोर आले आहे.
का होतोय सुनावणीला उशीर?
नोव्हेंबर 2022 मध्ये या अंगावर शहारे आणणाऱ्या गुन्ह्याची नोंद झाली आणि मे 2023 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 215 पेक्षा जास्त सुनावण्या पार पडल्या आहेत, परंतु अजूनही पुराव्यांची आणि साक्षीदारांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी आफताबला त्याचे एमए समाजशास्त्र परीक्षेचे पेपर्स देण्यासाठी सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी कधी दातांच्या उपचारांचे कारण, तर कधी मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याचे कारण देऊन सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली. पीडित कुटुंबाची मानसिक फरपट होत असताना, आरोपीच्या वैयक्तिक गरजांना खटल्याच्या वेगापेक्षा जास्त प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
( नक्की वाचा : Nashik News:"त्यांनी आमचा 20 किमी पाठलाग केला अन्...", नाशिकच्या पीडित महिलेनं सांगितला भयंकर अनुभव, VIDEO )
न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंब उद्ध्वस्त
या प्रदीर्घ खटल्यादरम्यान श्रद्धाचे वडील विकास वाळकर यांच्यासोबतच तिच्या आजीनेही अखेरचा श्वास घेतला. तपासादरम्यान सापडलेले श्रद्धाच्या शरीराचे अवयव अद्याप न्यायालयात पुरावा म्हणून जपून ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे श्रद्धाच्या मृतदेहावर तिच्या कुटुंबीयांना शेवटचे अंत्यसंस्कारही करता आलेले नाहीत. तिचे कुटुंब आजही या हक्काच्या अंत्यविधीसाठी डोळ्यात पाणी घेऊन वाट पाहत आहे.
"तो हसत येतो आणि हसत जातो..."
श्रद्धाची आत्या राजल नाईक या प्रत्येक सुनावणीसाठी मुंबईहून दिल्लीचा प्रवास करतात. त्यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि संतापाने आपल्या भावना व्यक्त केल्या. "आम्ही मुंबईहून दिल्लीला कोर्टाच्या तारखेसाठी जातो, पण तिथे गेल्यावर कळते की आरोपीच्या सोयीनुसार तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असेल, तर फास्ट ट्रॅक कोर्टाचा काय फायदा? असा सवाल श्रद्धाच्या आत्यानं विचारलाय. आफताब न्यायालयात हसत येतो आणि हसत निघून जातो, त्याला केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही", असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Jalna News: जालन्यात 'दृश्यम' स्टाईलने मित्राचाच केला गेम; 1 वर्षानंतर धक्कादायक सत्याचा पोलिसांकडून पर्दाफाश )
खटल्याला विलंब होण्याचे मुख्य कारण आरोपीच्या वकिलानी साक्षीदारांची घेतलेली प्रदीर्घ उलटतपासणी हे आहे. केवळ एका पोलीस हवालदाराची उलटतपासणी घेण्यासाठी तब्बल 8 वेगवेगळ्या सुनावण्यांचा वेळ लागला आणि ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. या विलंबामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.