लक्ष्मण सोळूंखे, प्रतिनिधी
Drishyam Style Murder in Jalna: जालन्यामध्ये एक वर्षापूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या एका तरुणाच्या रहस्यमयरित्या गायब होण्यामागचे धक्कादायक सत्य अखेर समोर आले आहे. अजय देवगण यांच्या 'दृश्यम' चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या या प्रकरणाचा जालना पोलिसांनी सखोल तपास करत पर्दाफाश केला आहे. आपल्याच मित्राने पैशांच्या वादातून हा खून केल्याचे उघडकीस आणल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
जालना शहरातील योगेशनगर येथील रहिवासी असलेला ऋषीकेश पवार हा तरुण 22 सप्टेंबर 2025 रोजी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तो सापडत नसल्याने अखेर तालुका जालना पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. ऋषीकेश अचानक रहस्यमयरित्या गायब झाल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली, मात्र सुरुवातीला त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी अत्यंत कठीण झाले होते.
जवळपास एक वर्षानंतर जालना पोलिसांचा दुसऱ्या एका गुन्ह्याचा तपास सुरू होता. या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून एक वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या ऋषीकेश पवार याच्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांना तपासाची एक नवी दिशा सापडली आणि त्यांनी तात्काळ चक्रे फिरवली.
( नक्की वाचा : Nashik News:"त्यांनी आमचा 20 किमी पाठलाग केला अन्...", नाशिकच्या पीडित महिलेनं सांगितला भयंकर अनुभव, VIDEO )
'दृश्यम' स्टाईलने केला मित्राचाच गेम
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ऋषीकेशचा मित्र असलेल्या अविनाश वाघमारे याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी सुरू केली. पोलिसांच्या खाक्या दाखवताच अविनाशने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याने ऋषीकेशकडून सुमारे 1 लाख रुपये उधार घेतले होते. ऋषीकेश या पैशांसाठी त्याच्याकडे सतत तगादा लावत होता, ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

याच वादातून त्याने ऋषीकेशला संपवण्याचा कट रचला. पार्टीच्या बहाण्याने अविनाशने ऋषीकेशला बठाण परिसरातील एका शेतात नेले. तिथे दोघांनी एकत्र बिअर प्याली. त्यानंतर पुन्हा त्यांच्यात पैशांवरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि अविनाशने प्रथम हाताने आणि नंतर नायलॉनच्या रुमालाने गळा आवळून ऋषीकेशचा निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने ऋषीकेशचा मृतदेह स्वतःच्या स्कॉर्पिओ कारमधून नेऊन दुधना नदीच्या पात्रात फेकून दिला.
( नक्की वाचा : Double Murder: आईच्या नोकरीवर डोळा,चुलत भावासोबत सूत; सख्ख्या आई-वडिलांचा काटा काढणारी 'ती' मुलगी कोण? )
कसा झाला गुन्हा सिद्ध?
आरोपीच्या कबुलीनामानंतर पोलिसांनी दुधना नदी परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 मध्ये सापडलेल्या बेवारस मृतदेहांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान अंबड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका बेवारस मृतदेहाची माहिती समोर आली. पोलिसांनी या मृतदेहाचे डीएनए नमुने आणि ऋषीकेश पवार यांच्या आईचे डीएनए नमुने यांची जुळवणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवले. रासायनिक विश्लेषक प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात तो मृतदेह ऋषीकेश पवार याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
डीएनए अहवाल सकारात्मक आल्यानंतर आरोपी अविनाश वाघमारे याच्याविरुद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास विशेष तपास अधिकारी म्हणून कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्याकडेच सोपवण्याचे आदेश दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world