विशाल पाटील, मुंबई
तिरूपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू हा सध्या संबंध देशात वादाचा विषय बनला आहे. लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या तुपामध्ये जनावरांची चरबी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण चर्चेत असताना सिद्धिविनायक मंदिराचे प्रसादाचे लाडू देखील चर्चेत आले आहेत. मंदिरात मिळाणारे प्रसादाचे लाडू उंदिर खात असल्याचा प्रकार उघडकीस आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिद्धविनायक गपणती मंदिरात सामान्य नागरिक ते सेलिब्रिटींची रीघ लागलेली असते. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक येथे येतात. आणि घरी जाताना प्रसाद म्हणून सिद्धिविनायक मंदिरात मिळणारा प्रसादाचा लाडू आवर्जून नेतात.
सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे तेथे मिळणारा लाडू देखील प्रसिद्ध आहे. मात्र हेच लाडू आता उंदिर खात आहेत. सिद्धिविनायक मंदिरात प्रसाद म्हणून देणाऱ्या लाडूच्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ले आढळली आहेत. तर मोठ्या प्रमाणत लाडूचे पॅकेट कुरतडून लाडू खाल्ले आहेत. याचा व्हिडीओ NDTV मराठीच्या हाती लागला आहे. मंदिर प्रशासन अशाप्रकारे भाविकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे का? असा सवाल भाविक विचारत आहेत.
गणपती बाप्पांचे वाहन उंदिर आहे, पण याच उदरांनी सिद्धिविनायक मंदिरात हैदोस घातला आहे. हा हैदोस इतका की थेट प्रसादात उंदिर दिसू लागले आहेत. इतकी चोख व्यवस्था असलेल्या आणि गर्भश्रीमंत असलेल्या मंदिरात कोणाचं याकडे लक्ष आहे की नाही? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
Siddhivinayak Temple
(नक्की वाचा- राज ठाकरे CM एकनाथ शिंदेंच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?)
भाविक मोठ्या श्रद्धेने देवाच्या चरणी येऊन कोणतीही शंका मनात न ठेवता प्रसाद खातात. पण अशा पद्धतीने भाविकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सिद्धिविनायक मंदिर प्रशासन करत असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.
या प्रश्नांची उत्तरे मिळणार का?
उंदरांचे साम्राज वाढले असताना न्यास मंडळ, अध्यक्ष सदा सरवणकर, मंदिर प्रशासन आणि कार्यकारी अधिकारी विणा पाटील नेमकं काय करत आहेत? कार्यकारी अधिकारी आणि विश्वस्त मंडळ यांचं ज्या लाडू डिपार्टमेंन्टकडून उत्पन्न मिळतंय त्याकडे दुर्लक्ष आहे का? यामध्ये नेमकं दोषी कोण? कार्यकारी अधिकारी की विश्वस्त मंडळ? यामधून कोणत्या भाविकांच्या आरोग्याची हाणी झाली तर याची जबाबदारी नेमकी कोणाची? अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA नेमकी यावर काय कारवाई करणार? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
(नक्की वाचा - 'मिरज पॅटर्न'ने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली? महायुतीला होणार फायदा )
मंदिर प्रशासनाची प्रतिक्रिया
सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी या प्रकाराबाबत म्हटलं की, या आरोपांमध्ये तथ्य आहे अथवा नाही हे तपासण्यासाठी चौकशी करण्यात येईल.