औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी; ट्रकसह चालकाला अटक, तर 87 लाखांचा मुद्देमाल जप्त

कराड – रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत ही तस्करीची घटना उघड झाली आहे. तस्करी करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली.

जाहिरात
Read Time: 1 min

सुजित आंबेकर, सातारा

औषधांच्या नावाखाली अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कराड – रत्नागिरी महामार्गावर कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत ही तस्करीची घटना उघड झाली आहे. तस्करी करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करत ट्रकसह 87 लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत कराडच्या पथकाला औषधांच्या नावाखाली अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. 

त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य (मुंबई), डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पथकाने लोहारवाडी गावच्या हद्दीत ट्रक थांबवून झडती घेतली.

यावेळी ट्रकमध्ये 87 लाख 11 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीच्या 15 हजार सीलबंद दारूच्या बाटल्या मिळाल्याने ट्रकचालक बनवारी रामला अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक तपास करत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article