Dadar Railway Station Viral Video : मुंबईतील महत्त्वाच्या स्टेशनपैकी एक असलेल्या दादर स्टेशनवर प्रवाशांची दररोज गर्दी उसळते. दादर रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचं केंद्रबिंदूच आहे. कारण दादरवरून अनेक एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असतात. तसच दादर रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वे स्थानकालाही जोडलेलं आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने जाणऱ्या प्रवाशांची या स्थानकात मोठी वर्दळ असते. काल दादर रेल्वे स्थानकात झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली होती. अशातच आज पुन्हा एकदा दादर रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरल्याचं पाहायला मिळालं.
दादर रेल्वे स्टेशन परिसरात नेमकं काय घडलं?
दादर रेल्वे स्टेशन परिसरात एक मोठा साप फिरत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. साप दिसताना प्रवाशांमध्ये भीती पसरली. काही प्रवासी सापाला पाहून भयभीत झाल्याचंही व्हिडीओ पाहायला मिळत आहे. साप दिसताच प्रवाशांची पळापळ झाली. पण थोड्या वेळात एका सर्पमित्राने त्या सापाला पकडलं आणि सुरक्षितपणे एका पोत्यात भरलं. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
मुंबई लोकल ट्रेन ही प्रवाशांची लाईफलाईन समजली जाते. अशातच दादर स्टेशनवर एखादी घटना घडल्यास मध्य रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडते. कारण दादर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी झुंबड पाहायला मिळते. स्टेशनवर जर काही भयावह घटना घडली तर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरीही होऊ शकते. कारण प्रवाशांचे लोंढेच्या लोंढे या स्थानकावर येत असल्याचं दररोज पाहायला मिळतं. अशातच रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.