Super El Nino 2026: विदर्भावर यंदा 'सुपर एल निनो'चे मोठे संकट घोंघावत असून, यामुळे कमी पाऊस आणि तीव्र उष्णतेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या एका अंतर्गत अहवालानुसार, अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून आगामी 31 ऑगस्टपर्यंत विदर्भातील धरणांमधील नियोजित पाण्यापैकी तब्बल 37 टक्के पाणी केवळ बाष्पीभवनामुळे (उष्णतेमुळे वाफ होऊन) कमी होऊ शकते. यासंदर्भात विदर्भातील धरणांमधील पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.
6 जिल्ह्यांमध्ये पाण्याचे नियोजन आणि बाष्पीभवनाचा अंदाज | Water Budget and Evaporation Forecast for 6 Districts
जलसंपदा विभागाच्या पुनरावलोकन विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 1 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत विदर्भातील सहा प्रमुख जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली - एकूण 655.52 दशलक्ष घनमीटर (Mcum) पाण्याचा वापर नियोजित आहे.
पण या कालावधीत पडणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे सर्वाधिक फटका जलसाठ्यांना बसणार आहे. या नियोजित वापरापैकी तब्बल 245.69 Mcum पाण्याचे केवळ बाष्पीभवना जाईल. या तुलनेत शेतीसाठी 223.06 Mcum, पिण्याच्या पाण्यासाठी 115.37 Mcum आणि औद्योगिक वापरासाठी 71.40 Mcum पाणी वापरले जाण्याचा अंदाज आहे. म्हणजेच प्रत्यक्षात वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा उष्णतेमुळे वाया जाणारे पाणी जास्त असणार आहे.
(नक्की वाचा : Rain Alert: कुठे यलो तर कुठे रेड अलर्ट! उष्णतेमुळे विदर्भाची होतेय भट्टी तर 'या' 5 जिल्ह्यांत पावसाचा इशारा)
गेल्या वर्षापेक्षा पाणीसाठा चांगला, तरीही चिंता कायम | Current Water Storage Status in Vidarbha Dams
विदर्भ सिंचन विकास महामंडळ (VIDC) अंतर्गत नागपूर विभागातील जलसाठ्यांमध्ये सध्या एकूण 2,232.49 Mcum उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षी मे महिन्याच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा 541.51 Mcum पाणीसाठा जास्त आहे.
नागपूर विभागातील VIDC अंतर्गत एकूण 370 धरणे आणि बॅरेजेसचे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये 12 मोठी धरणे, 43 मध्यम आणि 315 लहान प्रकल्पांचा समावेश आहे. जरी सध्याचा पाणीसाठा समाधानकारक असला, तरी 1 सप्टेंबरपर्यंत हा साठा घटून 1,627.46 Mcum वर येण्याची शक्यता आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, शेती, उद्योग आणि बाष्पीभवनाचा वाटा समाविष्ट असल्याने अधिकारी पुढील महिन्यांसाठी चिंतेत आहेत.
(नक्की वाचा : पंढरपुरात खळबळ! चंद्रभागा नदी धोक्यात? 'त्या' घटनेने सर्वच चक्रावले, स्थानिकांच्या मनात निर्माण झाली मोठी भीती)
नागपूर शहरात पाणी वाया घालवणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश | Action Against Water Wastage in Nagpur Cityएकिकडे नैसर्गिक कारणांमुळे पाणी आटत असताना, दुसरीकडे नागपूर शहरात मानवनिर्मित कारणांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर होणारी पाणी गळती आणि बेकायदेशीर जोडण्यांमुळे पाणी वाया जात असल्याने प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. अशा बेकायदेशीर प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(नक्की वाचा : Nagpur News: नागपुरात उन्हाचा हाहाकार! 9 दिवसांत तब्बल 26 अज्ञात मृतदेह सापडले; उष्माघाताने बळी गेल्याची चर्चा)
सध्या तरी जलसंपदा विभागाने तातडीची पाणीटंचाई नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी आगामी काळातील विदर्भाची परिस्थिती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून राहणार आहे.