Suresh Kalmadi Death News : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (6 जानेवारी 2026) दीर्घ आजारानं निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. भारतीय हवाई दलाचे पायलट ते दिल्लीतील ज्येष्ठ काँग्रेस नेते असा कलमाडी यांचा प्रवास होता. पुणे शहरातील काँग्रेसवर तसेच महापालिकेवर त्यांचे दीर्घकाळ नियंत्रण होते. शरद पवार समर्थक म्हणून राजकारणात आलेले कलमाडी पुण्यात काही काळ पवारांनाच वरचढ ठरले होते. त्यांना हटवण्यासाठी पवारांना शिवसेना आणि भाजपा या दोन कट्टर विरोधी पक्षांशी हातमिळवणी करावी लागली होती.हे संपूर्ण प्रकरण राज्याच्या राजकारणात 'पुणे पॅटर्न' म्हणून प्रसिद्ध आहे.
कलमाडींचा प्रवास
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीधर झालेले सुरेश कलमाडी यांनी खडकवासलामधील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून पदवी घेतली होती.हवाई दलातील पायलट म्हणून काम केले होते. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.हवाई दलातून निवृत्ती घेतल्यानंतर कलमाडी राजकारणात आले. 1970 च्या दशकात पुणे युवक काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांच्याकडं होतं. पुढे ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्य बनले.
सुरेश कलमाडी हे त्यानंतरच्या काळात पुण्यातील आणखी एक मातब्बर राजकारणी शरद पवारांच्या जवळचे बनले. शरद पवारांसोबत काँग्रेस एस. मध्येही ते होते. पवारांच्या या पक्षातर्फे 1982 साली ते राज्यसभा खासदार बनले. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याचा कारभारी कोण? 165 जागा, 1165 उमेदवार; वाचा प्रत्येक वॉर्डातील हायव्होल्टेज लढती! )
पुणे काँग्रेसवर पकड
1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे काँग्रेसमधील बडे नेते विठ्ठलराव गाडगीळ पराभूत झाले. त्यानंतर पुणे काँग्रेसचं नेतृत्त्व कलमाडींकडं आलं. शरद पवारांशी जवळीकतेचा त्यांना फायदा झाला.
राजीव गांधी यांच्या निधनानंतर शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं यासाठी कलमाडी यांनी दिल्लीत प्रयत्न केले होते. त्यानंतर केंद्रात पवार आणि पुणे शहरात कलमाडी असं समीकरण रुढ झालं.
त्यानंतर पुण्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात कलमाडी यांचं योगदान मोठं होतं. बालेवाडीत क्रीडा अकादमी याच काळात झाली. याच स्पर्धेपासून क्रीडा क्षेत्राशी घनिष्ठ नातं निर्माण झालं.
1997 साली त्यांनी काँग्रेस सोडली. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत कलमाडी अपक्ष म्हणून लढले. भाजपा-शिवसेना युतीनं पाठिंबा देऊनही कलमाडी पराभूत झाले. या पराभवानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आणि पुण्याचे खासदार बनले.
( नक्की वाचा : Shivraj Patil : अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्यानं झाला होता शिवराज पाटालांचा लातूरमध्ये विजय )
सबसे बडा खिलाडी- सुरेश कलमाडी
1990 च्या दशकातच पुणे महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आली. 1999 साली शरद पवारांनी काँग्रेस सोडलं. त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस हा पुण्यातील मोठा पक्ष ठरला. काँग्रेसच्या ताब्यात पुण्याचं महापौरपद आणि पर्यायानं शहराचा कारभार होता.
'सबसे बडा खिलाडी-सुरेश कलमाडी' ही घोषण याच काळात कलमाडी समर्थकांनी शहरात लोकप्रिय केली. एव्हाना अजित पवारांचा राज्याच्या राजकारणा उदय झाला होता.
अजित पवारांना पुण्याचा कारभार आपल्या हातात हवा होता. याच कारणामुळे शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्यात वितुष्ट झालं.
पुणे पॅटर्नचा जन्म
सुरेश कलमाडींचं पुण्यातील वर्चस्व मोडण्यासाठी पुणे महापालिका जिंकण्याचा निर्धार पवारांनी केला. 2007 मधील पुणे मनपा निवडणूक काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच कलमाडी विरुद्ध पवार अशी झाली.
या निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांनी पुणेकरांना 'कारभारी बदला' असं आवाहन केलं.
विशेष म्हणजे तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. केंद्रीतील काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारमध्ये शरद पवार हे ज्येष्ठ मंत्री होती. दिल्ली आणि मुंबईत काँग्रेस नेत्यांसोबत सत्ता उपभोगणाऱ्या शरद पवांनी पुणे महापालिकेच्या सत्तेसाठी शिवसेना-भाजपा यांच्याशी हातमिळवणी केली होती.
सुरेश कलमाडींना हटवण्यासाठीच हे सारं अजित पवारांच्या पुढाकारानं आणि शरद पवारांच्या संमतीनं घडलं होतं.
हा पुणे पॅटर्न फार काळ टिकला नाही. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा पॅटर्न संपुष्टात आला. हा पुणे पॅटर्न चूक असल्याची कबुली शरद पवारांनी पुढील काळात दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world