Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या औद्योगिक महामार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी अखेर ठोस पावले उचलण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या थेट निर्देशानंतर या 54 किलोमीटरच्या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
2 आणि 4 दिवसांत दुरुस्तीचे टप्प्याटप्प्याने नियोजन
या 54 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गापैकी तुलनेने कमी खराब झालेल्या 40 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती अवघ्या 2 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय औद्योगिक वसाहतींमधून (MIDC) जाणाऱ्या आणि सर्वाधिक खराब झालेल्या 14 किलोमीटरच्या पट्ट्यातील खड्डे बुजवणे, साईड शोल्डर दुरुस्त करणे आणि भरावाचे काम पुढील 4 दिवसांत पूर्ण करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
12 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि निधीची तरतूद
या मार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पुढील 2 महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. या कामाच्या तातडीच्या गरजेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाऐवजी हे काम 1 वर्षासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आले होते. यासाठी 59 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला होता.
( नक्की वाचा : Pune News: 24 तास काम अन् पर्यायी मार्ग! चाकणमधील रस्ते दुरुस्तीबाबत प्रशासनाने काय घेतला निर्णय? वाचा... )
सार्वजनिक बांधकाम विभागाने जानेवारी 2026 मध्ये या कामाचे आदेश दिले होते. मात्र, रस्त्यालगत असलेल्या वेगवेगळ्या सेवा वाहिन्यांचे अडथळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे कामाला काही काळ ब्रेक लागला होता. मात्र, आता सर्व अडचणींवर मात करत दुरुस्तीच्या कामाला मोठी गती देण्यात आली आहे.
3 महिन्यांत कायमस्वरूपी कामाला सुरुवात होणार
नागरिकांना या समस्येतून कायमची मुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून (MSIDC) या मार्गाच्या कायमस्वरूपी दर्जोन्नतीचे काम हाती घेतले जाणार आहे. पुढील 3 महिन्यांत या मोठ्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे भविष्यात तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सक्षम आणि गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे.