मनोज सातवी, पालघर
नालासोपारा पूर्वेच्या ओस्वाल नगरी येथील एका खासगी शिकवणीमधील निर्दयी शिक्षिकेने क्षुल्लक कारणावरून 10 वर्षाच्या मुलीच्या कानाखाली मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या मारहाणीत तिच्या श्वसन नलिकेसह मेंदूला जबर मार लागला असून तिच्यावर मुंबईतल्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दीपिका अंबाराम पटेल असं पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीचे नाव आहेत. गेल्या 8 दिवसांपासून मुलगी व्हेंटिलेटवर असून मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या रत्ना सिंग या शिक्षिकेविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेच्या ओस्वाल नगरी येथे दीपिकाचे वडील अंबाराम पटेल यांचे किराणा दुकान आहे. त्यांची 10 वर्षांची मुलगी दीपिका पाचवीमध्ये शिक्षण घेत आहे. 5 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे याच परिसरात असलेल्या रिना क्लासेसमध्ये दीपिका शिकवणीसाठी गेली. त्यावेळी वर्गात मस्ती करत असल्याच्या करणाने येथील शिक्षिका रत्ना सिंग हिने दीपिकाच्या उजव्या कानाखाली जोरदार चापट मारली. यामुळे तिच्या कानातील कर्णफुलाचा मागील टोकदार भाग कानाच्या पाठीमागील बाजूस लागून गंभीर दुखापत झाली.
मारहाणीनंतर दीपिकाची तब्येत बिघडल्याने तिला सुरुवातीला विरारच्या खासगी रुग्णालयात विचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला 13 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपिकाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून ती कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) आहे. तसेच तिला उपचारासाठी दिवसाला 25 हजार रुपये खर्च येत आहे. त्यामुळे परिस्थिती बेताची असल्यामुळे विविध सामाजिक संस्थांकडून मदत मिळावी यासाठी ते फिरत आहेत.
दुसरीकडे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या रत्ना सिंग या शिक्षिकेविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिका रत्ना सिंग या शिक्षिके विरोधात कलम 125 (अ) (ब) तसेच बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदाच्या अधिनिमय 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.