Thackeray Family Photo : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येणार का? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात विचारला जात आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाची लढाई आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाबाबत चर्चा सुरु झाली. पण, शिवसेनासोडून मनसे स्थापन करणारे राज आणि बाळासाहेबांनंतर पक्षाचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंचं मनोमिलन होणार का? याबाबत अनेकांना शंका होती.
ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, दोन्ही बंधूंची कौटुंबीक मनोमिलन सुरु झालं आहे. राज्य सरकारनं हिंदी भाषेच्या सक्तीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील वरळीमध्ये विजयी सभा घेतली. या सभेच्या निमित्तानं मोठ्या कालखंडानंतर दोन्ही ठाकरे एका स्टेजवर आले. त्या कार्यक्रमाचा सर्वत्र मोठा गाजावाजा झाला.
या कार्यक्रमाच्या जोरदार चर्चेनंतर आजवर सातत्यानं ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु आहे. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. ही ठाकरे बंधूंची कौटुंबीक भेट होती. तर काही दिवसांपूर्वीच मतचोरीच्या मुद्यावर राज्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. ते दोघे यावेळी पत्रकार परिषदेमध्येही एकत्र होते.
( नक्की वाचा : गरीबी हटवणार बोलले, पण...; NDTV समिटमध्ये PM मोदींचा काँग्रेसला '25 कोटी'चा सवाल, BSNL वरूनही सुनावलं )
ठाकरे बंधूंचे फॅमिली फोटो
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेल्या 'दीपोत्सव' कार्यक्रमात शुक्रवारी (17 ऑक्टोबर) उद्धव ठाकरे सहभागी झाले. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते संपूर्ण परिवारासह दादरमधील राज ठाकरेंच्या घरी देखील गेले होते.
आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील नव्या पिढीचा एकत्र फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तो चांगलाच व्हायरल झालाय. या फोटोत आदित्य ठाकरे त्यांचे लहान भाऊ तेजस ठाकरे, राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे, अमित यांच्या पत्नी मिताली ठाकरे तसंच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हे सर्व एकत्र दिसत आहेत. ठाकरे घराण्यातील पुढच्या पिढीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ठाकरेंच्या नव्या पिढीप्रमाणेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा एकत्र फोटो देखील 'NDTV मराठी' च्या हाती लागलाय. या फोटोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे.
त्याचबरोबर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या बंधूंचा एकत्र फोटोही NDTV मराठी ला मिळाला आहे.
तसंच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या भावांचा फोटोही तुम्ही NDTV मराठीवर पाहू शकता.