Thane Metro: मुंबई आणि ठाण्यातील लाखो प्रवाशांचे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या जवळ आले आहे. ज्या थेट प्रवासाची अनेक वर्षे प्रतीक्षा होती, तो ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मेट्रो प्रवास लवकरच सत्यात उतरणार आहे. सोमवारी (22 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो 4 (Metro 4) मार्गिकेच्या पहिल्या चाचणी (Trial Run) पार पडली. या चाचणीनंतर ठाणे मेट्रोचं स्वप्न आणखी जवळ आलंय. त्याचबरोबर या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे आता 58 किलोमीटर लांबीच्या या भव्य मार्गिकेवरून थेट CSMT गाठण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे ठाणेकरांना वेळेची मोठी बचत होणार आहे, तसेच घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो 4 लाईनमुळे ठाणेकरांना अनेक मोठे फायदे होणार आहेत, ज्यात प्रवासाच्या वेळेची मोठी बचत आणि घोडबंदर भागातील रस्त्यांवरील वाहतूक कमी होणे समाविष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार, 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला CSMT ते ठाणे दरम्यान 58 किलोमीटर लांबीच्या कनेक्टेड मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यात मेट्रो 4, मेट्रो 4 अ (Metro 4A) आणि वडाळा ते CSMT दरम्यानची मेट्रो 11 (Metro 11) यांचा समावेश असेल.
देशातील सर्वात लांब मेट्रो लाईन, 21 लाख प्रवाशांना फायदा
ठाणे, मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारी ही 58 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन देशातील सर्वात लांब मेट्रो लाईन ठरणार आहे.
प्रवाशांची संख्या: मेट्रो CSMT ला जोडल्यानंतर दररोज तब्बल 21 लाख नागरिकांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. केवळ मेट्रो 4 कॉरिडोर सुरू झाल्यावर दररोज 13 लाख 42 हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.
प्रवासाच्या वेळेत बचत: मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ 50% ते 75% पर्यंत कमी होईल. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक नियमित होण्यास मदत होईल.
मेट्रो 4 आणि 4अ ची लांबी: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो 4 ची लांबी 32 किलोमीटर आणि मेट्रो 4 अ ची लांबी 35 किलोमीटर असेल. या संपूर्ण मार्गावर एकूण 32 स्टेशन असतील.
( नक्की वाचा : Thane Metro ठाणे मेट्रोचा 'ऐतिहासिक' दिवस; 16,000 कोटींचा प्रकल्प 'ट्रॅक'वर, वाचा 13 लाख प्रवाशांना कसा फायदा )
वेवेगळ्या मार्गांना जोडणी आणि कारशेड
मेट्रो 4 लाईन ही वडाळा ते कासारवडवली दरम्यान 32.32 किलोमीटर लांबीचा उन्नत (Elevated) मार्ग आहे, ज्यावर एकूण 30 स्टेशन असतील. हा मार्ग अनेक प्रमुख वाहतूक व्यवस्थांना जोडणी देणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल:
हा मार्ग पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई आणि ठाणे यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा असेल.
मेट्रो 11 (वडाळा ते CSMT) या सर्वात लांब मार्गाला जोडला जाईल, ज्यामुळे एकूण लांबी 55 किलोमीटर होईल.
सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेसवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, तसेच प्रस्तावित मेट्रो मार्ग 2ब (डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो 5 (ठाणे ते कल्याण), आणि मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) यांच्याशी ही लाईन जोडली जाईल.
मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा येथे 45 हेक्टर (एकर्स) जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही जागा मेट्रो 4, मेट्रो 4 अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 या सर्व लाईनसाठी डेपो म्हणून काम करेल.