
Thane Metro Update: ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झालाय. ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुरू होणार आहे. आज (सोमवार, २२ सप्टेंबर) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो मार्ग 4 व 4अ, टप्पा-1 च्या पहिल्या टप्प्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गायमुख ते विजय गार्डन स्टेशनपर्यंतच्या या तांत्रिक चाचणीचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसंच आमदार निरंजन डावखरे यावेळी उपस्थित होते.
हा मेट्रो मार्ग ठाणेकरांसाठी वेळ आणि ऊर्जा वाचवणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे मेट्रोची वैशिष्ट्य काय आहेत हे सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
लांबी आणि खर्च: मेट्रो मार्ग 4 (32.32 किमी) आणि मार्ग 4अ (2.88 किमी) मिळून हा एकूण 35.20 किमी लांबीचा भव्य प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 16,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रवासी क्षमता: या मार्गावर 8 डब्यांच्या मेट्रो धावणार असून, एकूण 32 स्थानके असतील. दररोज जवळपास 13.43 लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतील असा अंदाज आहे.
( नक्की वाचा : Thane Metro : ठाण्यात 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, वाचा सर्व माहिती एका क्लिकमध्ये )
कनेक्टिव्हिटी: ही मेट्रो सेवा पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, मुंबई आणि ठाणे शहर यांना जोडेल. विशेष म्हणजे, वडाळा ते सीएसएमटी जोडणाऱ्या मेट्रो 11 शी याची जोडणी झाल्यावर देशातील सर्वात लांब (58 किमी) मेट्रो कॉरिडॉर तयार होईल.
वेळेची बचत: यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवासाच्या वेळेत 50% ते 75% पर्यंत बचत होईल.

डेपो व्यवस्थापन: मोगरपाडा येथे 45 हेक्टर जागेवर मेट्रो डेपो उभारण्यात येणार आहे, जिथून मेट्रो 4, 4अ, 10 आणि 11 या मार्गांचे व्यवस्थापन केले जाईल.
मेट्रो मार्ग 4 व 4अ... वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 22, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएच्या 'मेट्रो मार्ग-4 व 4 अ, टप्पा-1, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी पार पडली, यावेळी त्यांनी चाचणीचा शुभारंभ केला.
मेट्रो मार्ग… pic.twitter.com/ggq9u24EpF
मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
या चाचणीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्ग 4 व 4अ चे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अनेक अडचणींवर मात करून हे काम पुढे नेल्याबद्दल त्यांनी एमएमआरडीएचे अभिनंदनही केले. ही महत्त्वपूर्ण वाहतूक सुविधा लवकर सुरू झाल्यास ठाणेकर आणि मुंबईकर दोघांनाही मोठा फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ठाणे रिंग मेट्रोला केंद्र सरकारने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world