पुण्यातल्या पोर्शे दुर्घटनेची चर्चा पण नागपुरच्या 'त्या' मर्सिडीज अपघाताचे काय?

नागपूरच्या प्रकरणातही दोन निष्पाप तरूणांना चिरडले गेले. त्यांचा घात करणारी तरूणी ही उच्चभ्रू आहे. तीही सध्या जामीनावर आहे. तीचा जामीन रद्द व्हावा यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे ती मोकाट आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
नागपूर:

संजय तिवारी 

पुण्यामध्ये एका अल्पवयीन मद्यधुंद तरूणाने पोर्शे कारने दोघांना चिरडले. त्यानंतर या प्रकणाची चर्चा पुण्यातच नाही तर देशात झाली. सर्व यंत्रणा हलली. जामीन मिळालेल्या तरूणाचा जामीन रद्द करण्यात आला. त्याला बालसुधागृहात धाडण्यात आले. तर त्याच्या वडीलांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एकीकडे हे प्रकरण असताना याच्याशी साधर्म्य असलेला अपघात फेब्रुवारी महिन्यात नागपुरात झाला होता. या अपघातात मर्सिडीज कारने दोन तरूणांना उडवले होते. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. मर्सिडीज तरूणी चालवत होती. तिच्या बरोबर तिची मैत्रीणही होती. या दोघींनीही मद्य प्राशन केले होते असा त्यांचावर आरोप आहे. या दोघीही श्रीमंत घरातल्या होत्या. या प्रकरणात आरोपींना तातडीने जामीन मिळाला होता. मात्र त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी अजूनही काही हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे पुणे अपघातानंतर नागपूर मर्सिडीज अपघाताची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
   
'तो' अपघात कसा झाला?  

पुण्याच्या अपघातासोबत साधर्म्य सांगणारा एक अपघात याच  25 फेब्रुवारीला नागपुरात झाला होता. 32 वर्षीय मोहम्मद अतिफ आणि 34 वर्षीय मोहम्मद हुसैन हे राम झुल्यावरू दुचाकीने जात होते. त्याच वेळी त्यांच्या मागून एका मर्सिडीजने त्यांना जोरदार धडक दिली. रात्री दीड वाजता हा अपघात झाला. या अपघातात मोहम्मद हुसैन हा जागीच ठार झाला. तर मोहम्मद अतिफ याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रितिका मालू आणि माधुरी सारडा या दोघी यावेळी मर्सिडीजमध्ये होत्या. रितीका ही गाडी चालवत होती. यावेळी या दोघींनी मद्यपान केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणीतही बाब स्पष्ट झाली होती.  

Advertisement

हेही वाचा - महाराष्ट्र हादरला! 4 दुर्घटनांत 20 जणांचा बुडून मृत्यू

अपघातानंतर तातडीने जामीन 

या दोन्ही महिला उच्चभ्रू कुटुंबातील आहे. अपघात झाल्यानंतर त्यांचे पती घटनास्थळी आले. पोलीसही तिथे हजर होते. त्यावेळी त्यांच्या समोरून त्या दोनही महिलांनी पळ काढला असा आरोप मृतांच्या नातेवाईकांचा आहे. एकाचा मृत्यू झाला होता तर एक जण मृत्यूशी झुंज देत होता. अशा वेळी त्या महिला तिथून पळून गेल्या. विशेष म्हणजे पुढच्या चोवीस तासात त्यांना जामीनही मिळाला.  त्यांच्या रक्तात दारूचे प्रमाण आढळले. वैद्यकीय तपासणीही तब्बल सहा तासानंतर करण्यात आली.  पोलिसांनी या दोघींविरोधात सुरूवातीला 304 A अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात बदल करणे गरजेचे होते. 304 दाखल करण्यासाठी पोलिसांनी पुढचे 48 तास लावले. त्यामुळे सध्या या दोघी मोकाट आहेत. हा जामीन रद्द होण्यासाठी आता तारीख पे तारीख सुरू आहे. त्यामुळे अपघातात मरण पावलेल्यांचे नातेवाईक हताश झाले आहेत.  

Advertisement

हेही वाचा - इंदापूर बोट दुर्घटना : 'जगा असं की...'; मृत्यूनंतर गोल्याचं 'ते' व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत

प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले? 

मयुरेश भूषण दडवे यांच्या डोळ्यादेखत हा अपघात झाला होता.  ते सांगतात की, "गाडीत दोन महिला होत्या. त्यातली एक माधुरी सारडा होती. तर ड्रायव्हिंग सीटवर रितू मालू होती. अपघातानंतर या दोघींनाही त्याने सांगितले तुम्ही चुकीचे केले आहे. या मुलांना तातडीने उपचारासाठी घेवून चला. पण त्या दोघींनी काही प्रतिसाद दिला नाही. त्यांना मदतीसाठी वारंवार सांगूनही त्यांनी काहीच ऐकले नाही. त्या दोघीही दारू प्यायल्या होत्या." त्यानंतर दडवे यांनी पोलिसांना फोन लावला. पोलिस घटनास्थळी आले. त्याच वेळी त्या दोघींच्या कुटुंबातले ही तिथे आले. त्यानंतर त्या दोघींना ते घेऊन गेले असे दडवे यांनी आपल्या जबानीत सांगितले आहे. 

Advertisement

हेही वाचा - पोलीस होण्याचं स्वप्न, अकॅडमीत दाखलही झाला, मात्र प्रशिक्षणादरम्यान आकाशचा शेवट

पुण्याला एक न्याय नागपूरला दुसरा न्याय का? 

पुणे प्रकरणात पोलिसांवर सर्व बाजूने दबाव आल्यानंतर तातडीने पाऊले उचलली गेली. सुरूवातीला अल्पवयीन तरूणाला जामीन मिळाला होता. तो जामीन रद्द करण्यात आला. नागपूरच्या प्रकरणातही दोन निष्पाप तरूणांना चिरडले गेले. त्यांचा घात करणारी तरूणी ही उच्चभ्रू आहे. तीही सध्या जामीनावर आहे. तीचा जामीन रद्द व्हावा यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे ती मोकाट आहे. आता तरी नागपूर पोलिस या प्रकरणात लक्ष घालून तिचा जामीन रद्द करण्यासाठी पाठपूरावा करतील का? अशी विचारणा होत आहे. या प्रकरणात अजामीनपात्र कलम लावले जाईल काय यावर नागपूरचे सत्र न्यायालया कडून 24 मे शुक्रवारी आदेश अपेक्षित आहे.  कायदेशीर लढाई दीर्घ काळ चालणारी आहे. मात्र, त्या दोन तरुणींना घटनास्थळावरून पसार होण्यास मदत करणारे त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस अधिकारी यांचेवर कारवाई होणार का? हा प्रश्नही या निमित्ताने चर्चिला जात आहे.