अनुज रायते, प्रतिनिधी
Mumbai News Today : अमेरिका-इराण युद्धाच्या झळा भारताच्या एलपीजी गॅस पुरवठ्यालाही बसल्या आहेत. पश्चिम आशिया युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला एलपीजी गॅसच्या संकटाला सामोरं जावं लागतंय. देशासह अनेक राज्यांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, मुंबईतल्या एलपीजी तुटवड्याचा परिणाम आता फक्त घरांपुरता मर्यादित राहिलेला नाही,तर तो धारावीसारख्या लघुउद्योगांवरही होत असल्याचं समोर आलंय. कामगार गावाकडे परतत आहेत आणि छोट्या उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होतोय.मुंबईतील एलपीजीचा तुटवडा आता शहरासाठी मोठं आर्थिक संकट बनण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धारावी मुंबई शहरातील एक मोठं लघुउद्योगांचं केंद्र आहे.येथील शेकडो कामगार गावाकडे परतत आहेत.कारण पारंपरिक भिशींमध्ये जिथे स्वस्तात जेवण मिळायचं, तिथे आता नागरिकांना कोळशावर अवलंबून राहावं लागत आहेत.
"कोळशाच्या वाढत्या दरामुळे जेवणंही महागलं"
"गॅस नसल्यामुळे कोळशावर स्वयंपाक करावा लागत आहे. तसच कोळशाच्या वाढलेल्या दरामुळे जेवणाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे कामगारांसाठी रोजचं जेवणही महाग झालं आहे",अशी प्रतिक्रिया कोळसा शॉप मालक यादव यांनी दिली आहे. "धारावीमध्ये 25 वर्षांपासून काम करणारे कामगार सांगतात की,व्यवस्थित सिस्टीम नसल्यामुळे त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल तर सरकारकडून ठोस पावलं आणि धारावी पुनर्विकासासारख्या उपाययोजना गरजेच्या आहेत",असं टेक्स्टाईल कामगार इस्रार अहमदने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील कोचिंग क्लासमध्ये भयंकर घटना, आठवीच्या विद्यार्थ्याचे प्रायव्हेट पार्टचे फोटो काढले अन्..
"वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसवणं कठीण"
"अनेक कामगारांनी धारावी सोडली आहे.कमी उत्पन्नात वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसवणं कठीण झालंय.त्यामुळे अनेक जण गावाकडे परतण्याचा विचार करत आहेत",अशी प्रतिक्रिया टेक्स्टाईल इंडस्ट्री ओनर हकीमने दिली आहे. महाराष्ट्र सरकारने अनेकदा स्पष्ट केलंय की लॉकडाउन लागणार नाही. पण त्यामुळे कामगारांची भीती अजूनही कमी झालेली नाही.पुढे सरकार काय निर्णय घेतंय,हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.