सूरज कसबे, लोणावळा
Lonavala News : लोणावळ्यामधील सध्याचं वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पावसाळी निसर्ग, डोंगरावर पसरलेली गार हिरवाई, धबधबे आणि थंडगार आल्हाददायक वारा याचा आनंद घेण्यासाठी लाँग वीकेंडमध्ये पर्यटकांची पाऊले लोणावळ्यात वळू लागली आहे. त्यामुळे लोणावळा शहरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमीच्या सलग सुट्ट्यांमुळे हॉटेल्स, रिसॉर्ट आणि चिक्की दुकाने पर्यटकांनी गच्च भरली आहेत. टायगर पॉईंट, लायन पॉईंटसारख्या लोकप्रिय ठिकाणी उत्साही वर्दळ दिसत आहे. सध्या पावसाच्या सरींनी धुंद झालेले लोणावळ्याचे डोंगर पर्यटकांना वेड लावत आहे. स्थानिक चिक्की व्यापारालाही जोरदार चालना मिळत आहे.
(नक्की वाचा- Independence Day 2025: देशातील 7 ऐतिहासिक शहरांना भेट द्या अन् साजरा करा स्वातंत्र्यदिन)
पर्यटकांनी लोणावळ्यात प्रत्येक पॉइंटवर सुरक्षित पर्यटन करावे, वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच लोणावळ्यातील नागरिकांनी आणि चिक्की व्यावसायिक यांनी पर्यटकांना सहकार्य करावे, जेणेकरून कोणत्याही पर्यटन क्षेत्राला गालबोट लागणार नाही, असं आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केलं आहे.
साध्या वेशात पोलीस बंदोबस्त
काही बेफाम तरुणाईच्या हुल्लडबाजीमुळे इतरांचा आनंद मातीमोल होऊ नये, यासाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या माहितीनुसार, साध्या वेशातील पोलीस थेट गर्दीत फिरणार असून, लाँग वीकेंडदरम्यान पर्यटनस्थळांवर पोलिसांची करडी नजर ठेवली जाणार आहे.
(नक्की वाचा- HSRP Number Plate: 'एचएसआरपी' प्लेट अद्याप बसवली नाही? राज्य सरकारचा मोठा दिलासा, वाचा नवी मुदतवाढ आणि नियम)
मद्यप्राशन, धोकादायक स्टंट, वाहनांचे अवाजवी हॉर्न व वेगवान ड्रायव्हिंग अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. लोणावळा येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नियमांचे पालन करून, शांततेत व सुरक्षिततेत पर्यटन करावे, अन्यथा थेट पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.